पुष्पोत्सव: कार्यक्रमात राष्ट्रवादीचे गालबोट; प्रवेशव्दारावर उपोषणाने नामुष्की

पुष्पोत्सव: कार्यक्रमात राष्ट्रवादीचे गालबोट; प्रवेशव्दारावर उपोषणाने नामुष्की

नाशिकच्या वैभवात भर टाकणार्‍या पुष्पोत्सवाला महापालिकेच्या मुख्यालयात अर्थात राजीव गांधी भवनमध्ये गुरुवारी (दि.२१) दिमाखात सुरुवात झाली खरी; पण उदघाटनाच्या कार्यक्रमालाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाने गालबोट लावले. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकणे टाळल्याचा दावा करीत कार्यकर्त्यांनी उदघाटनाच्या भर कार्यक्रमात गोंधळ घातला. दुसरीकडे महापालिकेच्या प्रवेशव्दारावरच गेल्या वर्षीच्या पुष्पोत्सवाचे ठेकेदार आशिष दिवेकर यांनी पत्नीसह उपोषण सुरु केले आहे. लक्षवेधून घेण्यासाठी त्यांनी कार्टून्सच्या प्रतिकृती ठेवल्याने महापालिका प्रशासनाची पुरती नामुष्की होत आहे.
नाशिककरांचे लक्ष अनेक दिवसांपासून पुष्पोत्सवाकडे लागून होते. शहरात पुष्पोत्सवासारखे उपक्रम अभावानेच होत असल्याने नाशिककर या उत्सवाची डोळ्या तेल घालून वाट बघत होते. परंतु महोत्सवाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक गोंधळ घातला. पुष्पोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उदघाटन कार्यक्रमात घुसून निदर्शने केलीत. प्रमुख पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन होताच आंदोलन छेडण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्यासमोरच हा प्रकार सुरु असल्याने आयोजकांनाही मान खाली घालावी लागली. महत्वाचे म्हणजे उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी जो खुलासा केला तो ऐकून उपस्थित आवाक झाले.

काय म्हणाले उद्यान उपायुक्त?

उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही आंदोलक भूमिकेवर आडून बसले. आपल्याला आयुक्तांबरोबर यासंदर्भात चर्चा करायची आहे अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. अखेर उपायुक्तांनी खुलासा केला की, आपण स्वतः येवल्यात जाऊन भुजबळ यांना निमंत्रण दिले होते; मात्र आपण बाहेरगावी जाणार असल्याने ते येऊ शकत नाही असे भुजबळांनीच स्पष्ट केल्याने पत्रिकेत नाव टाकण्यात आले नाही. हे ऐकून कार्यकर्त्यांनी आंदोलन आटोपते घेतले. आंदोलनात जयप्रकाश गायकवाड, सत्यम पोतदार, आकाश कोकाटे, गणेश गायधनी आदींनी सहभाग घेतला.

पुष्पोत्सवाबाहेर दिवेकरांचे उपोषण

Ashish divekar Andolan

महापालिकेने गेल्या वर्षी भरविलेल्या पुष्पोत्सवाचे सहा लाख रुपये शिल्लक देयक आपल्यास मिळालेच नसल्याचा दावा करीत संबंधित ठेकेदार आशिष दिवेकर व त्यांच्या पत्नीने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर उपोषणास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी उत्कृष्ठ आयोजनाबद्दल महापालिकेने आपला सत्कारही केला होता, असे सांगत दिवेकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, निविदेतील ११८ कामे आम्ही वेळेत पूर्ण केली. शिवाय ऐनवेळी तोंडी सांगितलेली १४ कामे देखील आम्ही केलीत. मात्र उर्वरित देयकासाठी उपायुक्त शिवाजी आमले यांनी १.५० लाख रुपये लाच मागितली. यापैकी एक लाख रुपये देण्यात आले. मात्र त्यानंतरही उर्वरित पाच लाख ६९ हजार रुपयांचे देयक न मिळाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि त्यानंतर दिलेल्या एक लाखांपैकी ९० हजार रुपये परत करण्यात केले. दरम्यान, शिवाजी आमले यांंनी हे सगळेच आरोप खोडून काढत दिवेकर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

First Published on: February 20, 2020 10:07 PM
Exit mobile version