गोल्डन अव्हरमध्ये ऑपरेशन झालं म्हणून वाचलो, पण काहीजण…, ठाकरेंनी सांगितली आपबिती

गोल्डन अव्हरमध्ये ऑपरेशन झालं म्हणून वाचलो, पण काहीजण…, ठाकरेंनी सांगितली आपबिती

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यापासून जगभर आरोग्य आणीबाणी लादली गेली. त्याचकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आजाराशी सामना करत होते. तब्येत ठिक नसल्याने घरातूनच राज्याचा कारभार हाकत. यावरून विरोधकांनी गदारोळ केला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेच्या जखमेतून बरा होत नाही तोवर पक्षातूनच बंड उठलं. या सगळ्या प्रकऱणावरूनही उद्धव ठाकरे यांनी आपली मनोवस्था या मुलाखतीत विषद केली. गोल्ड अवरमध्ये शस्त्रक्रिया झाली म्हणून वाचलो. पण मी वाचू नये म्हणून अनेकजण देव पाण्यात घालून बसले होते. आणि आता तेच पक्ष बुडवायला निघाले आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच विषयांवर चर्चा केली.

हेही वाचा – सडलेली पानं झडलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं. सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे.

शस्त्रक्रियेच्या काळात ओढावलेल्या परिस्थितीचं कथन करताना ठाकरे पुढे म्हणाले की, त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात.

हेही वाचा – ज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद, उद्धव ठाकरेंचा घणाघात

वर्षापेक्षा मातोश्रीवर जास्त रिलॅक्स वाटतं!

पुन्हा ‘मातोश्री’वर आल्यावर जास्त रिलॅक्स झालात का असं प्रश्न राऊतांनी विचारल्यावर ठाकरे म्हणाले की, अर्थात! माझं घर आहे ‘मातोश्री.’ इथेच जास्त रिलॅक्स वाटणारच! मी तुम्हाला मुद्दाम माझे काही अनुभव सांगतो. जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली खरं तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. तो अनुभव माझा वेगळा आहे. फार विचित्र अनुभवातून मी गेलोय. त्या वेळेला जेव्हा अॅनेस्थेशियामधून मला जागवले. शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री होतो ना. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर अॅनेस्थेशियातून बाहेर पडताना मला डॉक्टरांनी विचारले की, सर कुठे जायचं? ‘मातोश्री’ की ‘वर्षा’? मी पटकन म्हटलं- मातोश्री! तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, तुम्ही मला अॅनेस्थेशिया दिला तेव्हा गुंगीत जरी विचारलं असतं ना तरी मी ‘मातोश्री’ हेच उत्तर दिलं असतं.

हेही वाचा – शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

मुळातच माझी ‘वर्षा’वर जाण्याची इच्छा होती का? याचं उत्तर सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून वाईट बोलतोय असं मुळीच नाही. ते एक वैभव आहे. मुख्यमंत्रीपदाचा आणि ‘वर्षा’चा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वास्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे एक वैभवशाली पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून सांगतो, मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्ने बघितली नव्हती. त्यावेळी जे घडलं ते आजच्या लोकांना ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू, त्यांना ते पूर्ण माहितेय की कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला होता.

First Published on: July 26, 2022 9:10 AM
Exit mobile version