माजी पोलीस आयुक्तांचा भोंगे मनाई आदेश रद्द

माजी पोलीस आयुक्तांचा भोंगे मनाई आदेश रद्द

नूतन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी माजी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढलेला भोंगे मनाई आदेश रद्द केला आहे. भोंग्याबाबत नाशिक शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढून घेण्याबाबत ३ मेपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच, नाशिक शहरातसुद्धा भोंगेप्रकरणी स्फोटक परिस्थिती निर्माण होवू शकते, असे माजी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले. याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त पांडेय यांनी 17 एप्रिल २०२२ रोजी भोंगे मनाई आदेश जारी केला होता. 3 मे २०२२ पर्यंत मशिदीसह सर्व धर्मस्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार होती. 3 मे नंतर जे परवानगी घेणार नव्हते त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार होते. मंदिरावर हनुमान चालिसा लावण्यासाठीसुद्ध परवानगी घ्यावी लागणार होती. अजानवेळी मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे, असे माजी पोलीस आयुक्त पाण्डेय आदेशात म्हटले होते. या आदेशाची राज्यभर चर्चा झाली. माजी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची २० एप्रिल २०२२ रोजी बदली झाली. त्यांची बदली पोलीस विशेष उपमहानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे झाली. त्यांच्या जागी व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. त्यांनी जे आदेश चांगले असतील ते कायम ठेवले जातील, असे सांगितले. भोंगे मनाई आदेशप्रकरणी आदेश पाहून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानुसार त्यांनी भोंगे मनाई आदेश रद्द करण्याचा आदेश काढला आहे.

स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नाही

नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वतंत्र भोंगे मनाई आदेशाची आवश्यकता दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यशासनाने ध्वनी प्रदूषणाबाबत परिपत्रकाव्दारे भोंगे वापराबाबत परवानगी, अटी व शर्ती, वेळ आणि आवाजाची मर्यादा याबाबत सविस्तर तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे भोंगे मनाई आदेश रद्द केला जात आहे, असे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी आदेशात म्हटले आहे.

First Published on: April 28, 2022 4:40 PM
Exit mobile version