वेतन द्या अन्यथा आत्महत्या करूद्या…

वेतन द्या अन्यथा आत्महत्या करूद्या…

नागपूर विभागातील एका एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता राज्यभरातून एसटी कर्मचार्‍यांनी आर्थिक संकटाला कंटाळून एसटी मुख्यालयात आत्महत्येचे पत्रक पाठविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळात चार कर्मचार्‍यांनी आत्महत्या करण्यासंबंधीचे पत्रक पाठविल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेकडून सरकारला इशारा

कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले असून गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांना नियमित वेतन मिळत नाही. तसेच कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी महामंडळाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे २५ टक्के वेतन अजून मिळालेले नाही. मे महिन्याचे ५० टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे १०० टक्के मिळेल की नाही याचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटकाळात कुटुंबियांच्या उदहनिर्वाहासाठी अनेक एसटी कर्मचारी भाजीपाला विकणे, गवंडी काम करताना दिसून येत आहेत. तसेच दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना २०१९  मध्ये एसटीच्या सेवेत सामावून घेतले, त्यातील १ हजार ५०० जणांची सेवा स्थगिती केली आहे. त्यामुळे नागपूरच्या एका कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आतापर्यंत आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर ऑल इंडिया पँथर सेनेकडून सरकारला इशारा देवून तत्काळ ४ हजार ५०० कर्मचार्‍यांच्या सेवा स्थगितीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच जर निर्णय रद्द केला नाही, तर राज्यभरात आंदोलन करू, असा इशारा एसटी महामंडळाला देण्यात आला आहे.

मुख्यालयात आत्महत्येचे पत्र

कर्मचार्‍यांना वेतन मिळत नसल्यामुळे कंटाळून चार एसटी कर्मचार्‍यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात वेतन द्या अन्यथा आत्महत्या करेन, असे मेलद्वारे पत्रक पाठविण्यात आले आहे. त्यामुळे एसटी महामंडळात सुद्धा खळबळ उडाली आहे. पत्र पाठविणार्‍या एका कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दैनिक आपलं महानगरला सांगितले की, अगोदर एसटी कर्मचार्‍यांचे वेतन कमी आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नाही. त्यामुळे कुटुंबियांचा उदहनिर्वाह करायचा कसा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला वेतन तत्काळ देण्यात यावे, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी पत्र पाठविले आहे. मात्र, यासंबंधी दैनिक आपलं महानगरने एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाला माहिती विचारली असता अशी कोणतीही माहिती आलेली नाही, असे सागण्यात आले आहे.

First Published on: July 28, 2020 8:43 PM
Exit mobile version