गणेश नाईक पुन्हा हादरले

गणेश नाईक पुन्हा हादरले

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत वाहून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक हे पुन्हा एकदा त्याच बेलापूर मतदार संघातून उभे राहणार असून त्यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे पक्षाची यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. त्यातच पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला ८० टक्के हून अधिक पदाधिकारी गैरहजर असल्याने गणेश नाईक कोणत्या पदाधिकार्‍यांच्या जीवावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

नवी मुंबईतील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचा ओढा भाजप आणि सेनेकडे आहे. राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघावर टांगती तलवार आहे. शुक्रवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. पाटील यांनी भाषणापूर्वी जिल्हा कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी,अल्पसंख्याक कार्यकारिणी, विभाग कार्यकारिणी,बेलापूर व ऐरोली विधानसभा पदाधिकारी यांची हजेरी घेतली. त्यावेळी पाटील यांना धक्काच बसला. तब्बल ७० टक्के हून अधिक पदाधिकारी गैरहजर होते.जर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बैठकीला हजर असेल तर प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने हजर राहायला हवे असे बोलून त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली.

अगोदरच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी भाजपशी जवळीक साधल्याने राष्ट्रवादीचा ऐरोली मतदार संघही डगमगला आहे.त्यामुळे परकीयांपेक्षा स्वपक्षीयांनकडून नाईकांना जास्त धोका असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.

माझे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्याकडे असलेल्या यादीकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी विचार केला की कोण कोण आले आहेत ते बघूया.सर्वांनी बैठकीला यावे अशा सूचना करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक जण आले नसतील.
-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस.

First Published on: October 9, 2018 1:04 AM
Exit mobile version