ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत, पोलिसांकडून शस्त्रेही जप्त

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत, पोलिसांकडून शस्त्रेही जप्त

कल्याण-डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागात दरोडा टाकण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सात जणांच्या टोळीला रामनगर पोलिसांनी सोमवारी रात्री प्राणघातक शस्त्रांसह अटक केली. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून म्हसोबानगर झोपडपट्टीतून ९० फुटी रस्त्याकडे पायी जाणाऱ्या प्रवाशांना लुटणे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेत दरोडा टाकण्याच्या निमित्ताने ही टोळी एकत्र आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

या टोळीमध्ये १६ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी डोंबिवली, ठाकुर्लीतील खंबाळपाडा, चोळेगाव, शेलार नाका, म्हसोबानगर झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. सागर उर्फ मुन्ना शंभु शर्मा (१९, रा. दिनेशनगर चाळ, खंबाळपाडा, ठाकुर्ली), जेम्स गांधी सुसे (२४, रा. म्हसोबानगर, आंबेडकर पुतळ्या जवळ, ठाकुर्ली), सत्यकुमार मुकेश कनोजिया (१९, रा. नेवाळी चौक, हेमंत पाटील चाळ, नेवाळी गाव), सचिन उर्फ पिल्लु उमाशंकर राजभर (२१, रा. म्हसोबानगर, चोळेगाव), सोनु मदन कनोजिया (१९, रा. व्हिलेज गार्डन ढाब्याच्या समोर, समीर पेपर मार्टच्या जवळ, चोळेगाव), दोन अल्पवयीन मुले त्रिमुर्तीनगर-शेलारनाका, खंबाळपाडा भागात राहतात.

रामनगर पोलीस ठाण्याचे हवालदार विशाल वाघ आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या गस्तीसाठी ठाकुर्ली, चोळेगाव, ९० फुटी रस्ता भागात दुचाकी वरुन सोमवारी रात्री फिरत होते. त्यांना ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकात अंधारात तरुणांचे एक टोळके उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाऊन चौकशी असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या जवळ दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक शस्त्रे आढळून आली.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून अनेक प्रवासी रात्रीच्या वेळेत रेल्वे मार्गाला समांतर झोपडपट्टीतून काळोखातून ९० फुटी रस्ता दिशेने येतात. अशा प्रवाशांना अडवून त्यांची लूट करण्याचा या टोळीचा इरादा होता, असे तपासात उघड झाले आहे.

रात्रीच्या वेळेत जमावाने जमण्यास ठाणे पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश जाहीर केला आहे. त्या आदेशाचा भंग या टोळीने केला आहे. त्यामुळे या टोळी विरुध्द पोलिसांनी दरोडा टाकणे, लुटमार कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने आतापर्यंत या भागात किती चोऱ्या, लुटमार केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत. या टोळीत लहान मुलांचा समावेश आढळून आल्याने पोलीस हैराण आहेत. आपली व्यसने पूर्ण करण्यासाठी तरुण अशा जाळ्यात ओढला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


हेही वाचा : गणेशोत्सवासाठी पालिकेसह पोलीस, रेल्वे, बेस्ट, एमएमआरडीए, अग्निशमन यंत्रणा सज्ज


 

First Published on: August 30, 2022 8:43 PM
Exit mobile version