आता विधवा महिलांना ‘या’ नावाने ओळखले जाणार; मंत्री मंगलप्रभात लोढांचा प्रस्ताव

आता विधवा महिलांना ‘या’ नावाने ओळखले जाणार; मंत्री मंगलप्रभात लोढांचा प्रस्ताव

अपंग हा शब्द अपमानकारक असल्याने पीएम मोदी यांनी दिव्यांग हा शब्द सुचवला आणि पुढे आदेश काढत तो सरकारी अधिकृत शब्द बनला. याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार, विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा हा शब्द न वापरता ‘गंगा भागिरथी’ या शब्दाचा वापर करावा असा प्रस्ताव तयार केला जात आहे. (ganga bhagirathi for widows as women and child development department proposal maharashtra)

समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय आणि त्यांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अपंग (Disabled) ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

याच धर्तीवर विधवांना (Widows) सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महिला व बाल विकास विभागाने (Department of Women and Child Development) एक प्रस्ताव तयार केला आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी महिला व बालकल्याण मंत्रालयातील प्रधान सचिवांना तसे पत्र लिहिले आहे.

गंगा भागिरथी (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी, असे मंगलप्रभात लोढा यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. अपंगांना दिव्यांग, दलितांना हरिजन हे शब्द बदलून वास्तव बदलणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शद्ब टोचण्यापेक्षा वास्तव टोचेल पाहिजेत, त्यासाठी बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – येत्या शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मुंबईत बैठक; मनपा निवडणुकीचा घेणार आढावा

First Published on: April 13, 2023 9:28 AM
Exit mobile version