मुंबईत सोने खरेदीत वाढ

मुंबईत सोने खरेदीत वाढ

दोन महिन्यांपासून बाजाराला आर्थिक मंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी वाहन आणि गृह खरेदीबाबत निरुत्साह दिसून आला. सोन्याने 40 हजाराचा टप्पा गाठला असतानाही नागरिकांनी मंगळावारी सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात सराफा दुकानात गर्दी केली. त्याचवेळी मुंबईतून फक्त 298 नव्या गाड्यांची खरेदी झाली तर एकाही नव्या घराची विक्री झाली नाही. त्यामुळे मुंबईच्या बाजारात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण दिसून आले.

दसर्‍याच्या मुहूर्तावर नागरिकांचा नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे बाजारात दसर्‍याला चैतन्य येते. त्यामुळे दसर्‍यातील मुहूर्तावर नागरिकांकडून होणार्‍या खरेदीमुळे बाजारातील मंदीला ‘ब्रेक’ मिळण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात सोने व कपडे खरेदी वगळता गृह, वाहन खरेदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असतानाही सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत आहे. दसर्‍यापूर्वी मोठ्या प्रमाणात सोन्याची बुकींग करण्यात आली तर दसर्‍याच्या दिवशी प्रत्यक्षात सोने खरेदीवर त्यातही नाणे खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल होता.

आर्थिक मंदीचा फटका वाहन क्षेत्राला बसला असून, दोन महिन्यांपासून वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच वाहनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे वाहन खरेदीबाबत फारसा नागरिकांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. गेल्यावर्षी मुंबईमध्ये दसर्‍याला 608 वाहनांची खरेदी झाली होती. मात्र यंदा फक्त 298 वाहनांचीच म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी वाहन खरेदी झाली.

त्याचप्रमाणे यंदाचा दसरा रियल इस्टेट क्षेत्रालाही शुभ ठरला नाही. दसर्‍यापूर्वी गृह खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात घरांबाबत व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात गृह घरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये दसर्‍याच्या मुहूर्तावर यंदा एकाही घराची विक्री झाली नसल्याने रियल इस्टेटमध्ये चिंतेचे वातावरण व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिक मंदीमुळे लोकांच्या नोकर्‍या व व्यवसायामध्ये अनिश्चितता आली. त्यामुळे घरांबाबत चौकशी होत असली तरी खरेदीकडे फारसा कल नाही. परिणामी यंदा दसर्‍यात रियल इस्टेटमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. त्याचा मोठा फटका या क्षेत्राला बसला आहे.
– अतुल तावडे, रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ

सोन्याच्या भावात वाढ होत असली तरी ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल आहे. दसर्‍यापूर्वी मोठ्या प्रमाणात सोन्याची बुकींग नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच दसर्‍याच्या दिवशीही सोने खरेदीबाबत नागरिकांमध्ये उत्साह असून त्यांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीला पसंती दिली आहे.
– सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पी.एन. गाडगील ज्वेलर्स

First Published on: October 9, 2019 6:42 AM
Exit mobile version