चिपी विमानतळावर विमानांपेक्षा कोल्ह्यांची वर्दळ अधिक, रनवेसाठी ठरताहेत अडथळा

चिपी विमानतळावर विमानांपेक्षा कोल्ह्यांची वर्दळ अधिक, रनवेसाठी ठरताहेत अडथळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ सुरू झाले. विमानतळाची उभारणी करण्यासाठी मागील २० वर्षांपासून अनेक प्रकारचे विघ्न समोर आले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे. कारण चिपी विमानतळावर विमानं धावण्याऐवजी कोल्ह्यांची धावपळ सुरू आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्हे वावरत असतात. त्यामुळे आता यावर तोडगा कसा काढणार, हा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्थानिक वन विभाग आणि विमान प्राधिकरण यांना या सोनेरी कोल्ह्यांना पकडण्यासाठी परवानगीची गरज आहे. त्यांना पकडल्यानंतर इतर जागी हलवण्याची आवश्यकता आहे. परंतु विमानतळाच्या परिसरात जवळपास २५ ते ३० कोल्ह्यांचा वावर सुरू असून मुंबईवरून सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या विमानांना उतरण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग या मार्गावर विमानाच्या दररोज तीन फेऱ्या होत असतात. परंतु कोल्ह्यांच्या सिंधुदुर्ग विमानतळावरील धावपट्टीमुळे वैमानिकांना विमान उतरवण्यास मोठा त्रास देखील होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानतळाच्या २७५ एकर भूभागाजवळ एक संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तसेच विमानतळाभोवती एका मोठे गवत देखील उभे राहीले आहेत. त्यामुळे कोल्ह्यांचा अधिकप्रमाणे वावर वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची दोन अंतर्गत कोल्ह्यांना संरक्षण देण्यात आले आहे. हे कोल्हे सर्व प्रकारचे फळं, पक्षी, कीटक, मासे आणि लहान प्रकारचे सस्तन प्राणी खातात. तसेच कोल्ह्याची शिकार करणे किंवा त्यांचा व्यापार करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

तोडगा कसा काढणार?

वन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, विमानतळाजवळ असणारे गवत आणि झुडुपे कोल्ह्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. त्यामुळे हे गवत आणि झुडुपे कापण्याची गरज असल्याचं वन विभागीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे. तसेच हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वावरत असतात. परंतु चिपी विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांनी विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले होते. त्यावेळी विमानाच्या पायलटने हे विमान धावपट्टीवर न उतरता पुन्हा आकाशात झेपावले आणि धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. त्यामुळे यंत्रणेसोबत प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आता कोल्हांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर तोडगा काढणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on: November 22, 2021 3:00 PM
Exit mobile version