मिरजमधील ‘त्या’ बांधकामांवर उद्या निकाल; ब्रह्मानंद पडळकर यांनी बांधकाम पाडल्याचा आरोप

मिरजमधील ‘त्या’ बांधकामांवर उद्या निकाल; ब्रह्मानंद पडळकर यांनी बांधकाम पाडल्याचा आरोप

सांगलीः भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांचा भूखंडासंदर्भात सुरु असलेल्या दाव्यावर उद्या, शुक्रवारी स्थानिक न्यायालय निकाल देणार आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मिरज येथील बांधकामांवर एका रात्रीत हातोडा पडला होता. ब्रह्मानंद पडळकर यांनी ही कारवाई केल्याचा आरोप होता. नंतर याप्रकरणात आरोपप्रत्यारोप झाले. या वादाची राज्यभर चर्चा झाली. उद्या या भूखंडाप्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मिरज शहरातील बसस्थानकाजवळ रस्त्या शेजारील दोन हॉटेल, केमिस्ट, दोन ऑफिस, एक घर, पान शॉप ६ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्रीच्या सुमारास पाडण्यात आले. जेसीबीच्यी सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली. ब्रह्मानंद पडळकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना ही जागा बळकवायची आहे. त्यामुळेच एका रात्रीत या बांधकामांवर हातोडा पडला, असा आरोप स्थानिकांनी केला . पालकमंत्री सुरेश खाडे हे या कारवाईमागे असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला.

पालकमंत्री सुरेश खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर त्यांनी ब्रह्मानंद पडळकर व त्यांच्या गुंडांवर कारवाई करावी. त्यांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी या कारवाईमुळे बाधित झालेल्यांनी केली. याचा गुन्हा नोंदवला नाही तर पालकमंत्री खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरु झाली.

मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, येथील बांधकामांंवर झालेली कारवाई योग्यच होती. काहीही चुकीचे काम झालेले नाही. हा भूखंड माझ्या भावाच्या नावावर आहे. तेथे अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण तोडण्याची नोटीस माझ्या भावाने गेल्या महिन्यात दिली होती. महापालिकेनेही तशी नोटीस दिली होती. तरीही बांधकाम काही हटवले गेले नाही. त्यामुळे ते पाडण्यात आले आहे. हे बांधकाम काढून आम्ही पालिकेला मदतच केली आहे, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. विरोधकांनी पडळकर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उद्या, शुक्रवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

First Published on: January 19, 2023 1:30 PM
Exit mobile version