सरकारी कर्मचारी-शिक्षकांना दिवाळीपूर्वीच पगार

सरकारी कर्मचारी-शिक्षकांना दिवाळीपूर्वीच पगार

दिवाळीपूर्वीच पगार

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी गुंतलेले असल्याने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि शिक्षकांना वेतन देणार नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहिर करण्यात आले होते. मात्र सरकारी कर्मचारी संघटनेने यासंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वीच देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी-अधिकारी व शिक्षकांना ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी देण्याबाबत ९ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. मात्र, कोषागार विभागातील कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाने ११ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकाद्वारे जाहिर करीत यापूर्वीच्या निर्णयाला स्थगिती दिली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.

निवडणुकीच्या तोंडावर १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची नाराजी नको म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त बलदेव सिंह यांच्या उपस्थितीत मुख्य सचिव अयोज मेहता व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे केली. अखेर कोषागार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मोकळे करण्याचे आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिले. त्यानंतर राज्याच्या वित्त विभागाने शासन परिपत्रक जारी केले आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच निवृत्ती वेतनही दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश सर्व विभागांना दिले.

हेही वाचा –

रविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात

First Published on: October 16, 2019 4:02 PM
Exit mobile version