डाॅक्टरांचे कमिशन होणार बंद; सरकार आणणार कट प्रॅक्टिसविरोधी कायदा

डाॅक्टरांचे कमिशन होणार बंद; सरकार आणणार कट प्रॅक्टिसविरोधी कायदा

संग्रहित छायाचित्र

वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस हा एक लाचखोरीचा प्रकार आहे. ज्यावेळी एखादा डॉक्टर आपल्याकडील रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवतो, त्यावेळी त्या संबंधित डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरकडून मोबदला दिला जातो. ज्याला कमिशन असे म्हणतात. पण यामुळे लाचखोरीसारख्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. बरेचसे डॉक्टर असा प्रकार करत असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे याच गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि डॉक्टरांमध्ये वाढलेली कट प्रॅक्टिस बंद करण्यासाठी याबाबत कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कट प्रॅक्टिसविरोधी कायदा आल्यानंतर डॉक्टरांना कमिशन मिळणे देखील बंद होणार आहे.

मागच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात यासंदर्भात बरेच काम झाले होते. मात्र, यावेळी याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे. जनसामान्यांमध्ये कट प्रॅक्टिसबद्दल प्रचंड रोष आहे. कच्च्या मसुद्यात काही बदल असल्यास त्यात बदल करून नवीन मसुदा तयार केला जाईल. प्रामाणिक डॉक्टरांवर याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ. अशा विषयावर कायदा बनविण्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये, प्रिव्हेन्शन ऑफ कट प्रॅक्टिस इन हेल्थ केअर सर्व्हिसेस ॲक्ट – २०१७ या नावाने कायदा करण्यासाठी सरकाने समिती स्थापन केली होती. यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्याचा कच्चा मसुदाही तयार करण्यात आला होता. त्यावर विधि व न्याय विभागाचे मतही घेण्यात आले. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांची समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, तर माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित या समितीचे अध्यक्ष होते. या समितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून डॉ. संजय ओक, डॉ. अविनाश सुपे, तत्कालीन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष, अन्य डॉक्टर आणि काही विधि तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे डॉक्टर संघटनांचे म्हणणे यामध्ये घेण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा कायदा त्यानंतर अस्तित्वात येऊ शकला नव्हता.

‘कट प्रॅक्टिस’ म्हणजे काय?
एखाद्या रुग्णाला उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवताना डॉक्टरकडून कमिशन घेणे, कमिशनची गरज नसतानाही पॅथॉलॉजी लॅब टेस्टसाठी पाठवणे यासारख्या उपक्रमांना वैद्यकीय क्षेत्रात कट प्रॅक्टिस म्हणतात. आर्थिक लाभ आणि औषध कंपन्यांकडून महागड्या भेटवस्तूंच्या बदल्यात विशिष्ट कंपनीचे औषध लिहून देणे देखील कट प्रॅक्टिसच्या कक्षेत येते.

हेही वाचा – आहेर मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह ६ जणांवर गुन्हा दाखल,चौघांना अटक

First Published on: February 17, 2023 8:54 AM
Exit mobile version