महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही…; राज्यपाल कोश्यारींचे अमित शाहांना पत्र

महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही…; राज्यपाल कोश्यारींचे अमित शाहांना पत्र

महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राज्याते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली होती. राज्यातील राजकीय नेत्यांनीही कोश्यारींची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता स्वत: राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात कोश्यारींनी “महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे”, असे लिहिले आहे. (Governor Bhagat Singh Koshyari letter to Union Home Minister Amit Shah)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजा यांसारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखला देत वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करु शकत नाही, असे म्हटले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले. राज्यपालांनी माफी मागावी, त्यांची पदावरुन पायउतार व्हावं अशी मागणी सातत्याने केली जात होती.

या पत्रात राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला आहे. “कोरोनाच्या काळात, जिथे अनेक मोठमोठ लोक आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले”, असे राज्यपाल यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केल्याने सुरू झालेला वाद अद्याप निवळलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानजनक विधान केल्याचा आरोप करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनीही कोश्यारींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.


हेही वाचा – गट वगैरे आम्ही मानत नाही, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना; संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

First Published on: December 12, 2022 11:36 AM
Exit mobile version