राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार! कधी, 26 जानेवारीपूर्वी की नंतर?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार! कधी, 26 जानेवारीपूर्वी की नंतर?

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नवनवीन वाद असे समीकरणच बनले आहे. यावरून विरोधकांनी त्यांना वारंवार हटविण्याची मागणी लावून तर धरली आहेच, शिवाय, भाजपालाही प्रत्येकवेळी त्यांच्या बाजूने सारवासारव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपर्यंत किंवा प्रजासत्ताक दिनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांना माघारी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

‘माय महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणे केले असून याबाबत दिल्लीतील त्यांचे बॉस केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याकडेही कोश्यारींबाबत काय करायचे, याचा निर्णय विचाराधीन आहे, असेही समजते. सध्या महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांचा नवा वाद नसल्याने हीच योग्य वेळ साधत येत्या आठवड्याभरात राज्यपाल कोश्यारींबाबत केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल कोश्यारी यांच्यात वाद सुरू होता आणि कोराना काळात तो विकोपाला गेला. मंदिरे खुली करण्याबाबत राज्यपालांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर वादग्रस्त ठरला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच नापसंती व्यक्त केली होती. मी राज्यपालांचे ते पत्र वाचले आहे. त्यांनी काही शब्द टाळायला हवे होते. ते शब्द टाळले असते, तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया त्यावेळी शाह यांनी दिली होती.

राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन आता सात महिने होत आले आहेत. मात्र, त्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांचा सत्ताधाऱ्यांबरोबरचा वाद मिटला असला तरी, वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे त्यांनी सुरूच ठेवले आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. तसेच मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण तशी ओळख राहणार नाही, असे विधान करून नव्या वादाला आमंत्रण दिले होते.

त्यापाठोपाठ राज्यपालांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान केले. समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे सांगितलेच, पण नंतर राज्यपालांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार राज्यपालांकडून होत असल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यांनी राज्यपाल हटाव ही मोहीम लावून धरली आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महामोर्चाही काढला होता. मात्र, राज्यपालांना सांभाळून घेण्याचीच भूमिका केंद्राने घेतली.

राज्यपाल कोश्यारींनाही परतीचे वेध
दुसरीकडे, कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्यपाल कोश्यारींनाही परतीचे वेध लागले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अहमदनगर येथे एका कार्यक्रमात त्यांनी ही भावना बोलून दाखविली होती. मला निवृत्त व्हायचे आहे, पण मी राज्यपालपदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले होते. तर, या महिन्याच्या सुरुवातीला राजभवनावर झालेल्या जैन समाजाच्या कार्यक्रमात, या पदावर राहण्याचा आनंद नाही, दु:खच आहे, असे म्हटले होते.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईदौऱ्यावर आले असताना, आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करू इच्छितो, अशी इच्छा राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती राजभवनने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

केंद्राकडूनही दखल?
महाराष्ट्रातील सत्ता पुन्हा हाती आल्याने राज्यपालांच्या विधानांमुळे होणारे निष्कारण वाद भाजपालाही नको आहेत. राज्यपाल आणि विरोधक यांच्यातील वाद टिपेला गेला असतानाच कोश्यारी यांना हटविण्यात आले, तर विरोधकांना बळ मिळाले असते. हे ध्यानी घेऊनच आता सर्व शमलेले असताना येत्या दोन-तीन दिवसांत राज्यपाल कोश्यारी यांना माघारी बोलावण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

दोन नावे चर्चेत
राज्यपाल कोश्यारी यांना माघारी बोलावल्यानंतर माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन किंवा भाजपाच्या जेष्ठ नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास, कोश्यारी यांच्याकडे नंतर कोणती जबाबदारी दिली जाते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

First Published on: January 23, 2023 1:09 PM
Exit mobile version