मुंबईत पावसामुळे शाळांसह आस्थापनांना सार्वजनिक सुटी जाहीर

मुंबईत पावसामुळे शाळांसह आस्थापनांना सार्वजनिक सुटी जाहीर

छायाचित्र प्रतिकात्मक

गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आज मंगळवारी पुन्हा मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यामुळे शाळांना राज्य सरकारने सुटी जाहीर केली आहे. तसेच मुंबईसाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना ही सुटी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान राज्य सरकारने मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेता आज मुंबई आणि उपनगरासाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सीईटी कौन्सिलिंग रद्द

मुंबईत आज होणारी सीईटी कौन्सिलिंग रद्द करण्यात आल्याचे सीईटी विभागाने म्हटले आहे. येत्या पाच जुलै रोजी आता ही कौन्सिलिंग मुंबईसाठी घेण्यात येणार आहे. मात्र राज्यातील इतर ठिकाणच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.

ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आज बंद

मुंबईसह ठाणे,कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.त्यामुळे खबरदारीचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज (मंगळवार,दि.२ रोजी)सर्व शाळा, महाविद्यालयात, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.  नागरिकांनी आपापल्या घरात सुरक्षितपणे रहावे, पर्जन्यमान स्थितीचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे. मुलांना,ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नये;असे आवाहन ही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज मंगळवार, दि. २ जुलै २०१९ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

First Published on: July 2, 2019 7:27 AM
Exit mobile version