राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं; गुलाबराव पाटलांची जहरी टीका

राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं; गुलाबराव पाटलांची जहरी टीका

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत (Shivsena) नाराज असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांना सूक्ष्म खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे, अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची विचारणा करण्यात आली. यावेर बोलताना त्यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला. “नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे,” अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली.

पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचे शिंदे यांच्याबाबत हवामान खात्याप्रमाणे अंदाज चुकीचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदेचा राणेंवर पलटवार

नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत, असा दावा केला होता. हा दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला. परंतु धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी नगरविकासच नाही तर कोणत्याही खात्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच संमतीने मंत्रिमंडळाला घ्यावा लागतो. नारायण राणे युतीच्या काळात मुख्यमंत्री राहिले आहेत त्यामुळे याची त्यांना जाणीव असेल, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत पण धोरणात्मक निर्णय घेताना पंतप्रधानांची संमती घेऊनच तो घ्यावा लागेल, असं म्हणत राणे यांनी केलेलं वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांची शनिवारी २१ ऑगस्ट रोजी वसई-विरारमध्ये जन आशीर्वाद यात्रा होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. “एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत. त्यामुळे ते बिचारे कंटाळलेत. अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधत आहेत. एक दिवस फोन करेन आणि मार्ग दाखवेन,” असं वक्तव्य राणे यांनी केलं. पुढे राणे यांना तुमच्याकडे येणार आहेत का असा प्रश्न केला असता आले तर घेऊन टाकू आम्ही, असं देखील राणे म्हणाले होते.


हेही वाचा – तुम्ही मंत्री असला तरी निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील; एकनाथ शिंदेचा राणेंवर पलटवार


 

First Published on: August 23, 2021 11:18 AM
Exit mobile version