अमरावती येथे रविवारी ‘हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा

अमरावती येथे रविवारी ‘हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा

प्रातिनिधिक फोटो

अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्यावतीने आणि जाणता राजा वेलफेअर सोसायटी व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने रविवार, २१ ऑक्टोबर रोजी शहरात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केनियातील आंतरराष्ट्रीय धावपटूंचा या स्पर्धेत सहभाग राहणार असून लाखो रूपयांची पारितोषिके विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.मॅरेथॉन स्पर्धेमध्ये २१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी पॉवर रन व लहान मुलांकरिता ५ किमी चिल्ड्रेन ड्रिम अशा ३ गटांचा समावेश राहणार आहे.

हजारहून अधिक धावपटूंनी केली नोंदणी

आतापर्यंत १३०० धावपटूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून जवळपास १५०० या धावपटू स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. देशातील ख्यातनाम धावकांनीसुद्धा या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ज्योती गवते, शारदा भोयर व शोभा देसाई यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेमध्ये अंध विद्यार्थीसुद्धा सहभागी होणार आहे. अंध धावपटूंसोबत एक मदतनीस राहणार आहे. टाटा ट्रस्ट संस्थेच्या १४० सदस्यांनीसुद्धा १० किमी पॉवर रनसाठी नोंदणी केली असून धावपटूंची अचूक वेळ नोंदविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टायमिंग चिपचा वापर करण्यात येणार आहे. तिन्ही गटातील धावपटूंसाठी आकर्षक मेडल व टीशर्ट तयार करण्यात आले आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वच स्पर्धकांना मेडल देण्यात येईल. स्पर्धेदरम्यान चार ठिकाणी एनर्जी स्टेशन राहणार असून येथे स्पर्धकांना पाणी, एनर्जी ड्रिंक व केळी पुरविण्यात येईल. स्पर्धेदरम्यान डॉक्टरांची चमू व रूग्णवाहिकाही तैनात राहणार आहे. स्पर्धेसाठी १०७ स्वयंसेवक उपलब्ध राहणार असून जिल्हा स्टेडियम परिसरातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे,अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

First Published on: October 19, 2018 1:44 PM
Exit mobile version