अखेर इंदुरीकर महाराजांना आरोग्य विभागाने बजावली नोटीस

अखेर इंदुरीकर महाराजांना आरोग्य विभागाने बजावली नोटीस

किर्तनकार इंदुरीकर महाराज

गर्भलिंद निदानासंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्याने अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकरांना अखेर आरोग्य विभागाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. गुरुवारी इंदुरीकरांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली असून यासंदर्भात इंदुरीकर यांचा खुलासा मागविण्यात आल्याची माहिती मिळाली. ‘आपलं महानगर’ने यासंदर्भात सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. इंदुरीकर यांच्याविषयी समाजाच्या सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये महानगरमधील वृत्तासंदर्भात चर्चा होऊन हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनीदेखील याची गंभीर दखल घेत निवृत्ती महाराजांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले होते. गुरुवारी मुरंबीकर यांच्या आदेशावरुन संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस महाराजांना बजावली. पंधरा दिवसात महाराजांचा खुलासा आल्यानंतर पुढील निर्णयासाठी ही बाब वरिष्ठांकडे पाठविली जाणार आहे.

व्हिडिओ अपलोड करणाऱ्यावरच कारवाई करा – इंदुरीकर महाराज

युट्यूबवरील ज्या व्हिडिओवरुन वाद उद्भवला आहे, ते किर्तन प्रसारित करण्याशी आपला संबध नसून संबधितांनी त्यासाठी आपली परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी घेतली असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून मिळाली. आरोग्य विभागाने पाठविलेली नोटीस त्यांनी स्वीकारली असून यासंदर्भात त्यांनी अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. पुढील आठ दिवसांचे आपले किर्तनाचे कार्यक्रमदेखील रद्द केल्याची माहिती समजली. महाराजांचे स्वत:चे कोणतेही युट्यूब चॅनल नसून त्यांच्याशी चर्चा न करता हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामुळे त्याच्या सत्यतेशी महाराजांचा संबध नसून त्यांच्या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित होताच, त्याच्यासाठी देखील परवानगी घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले.

गुन्हा दाखल करणार

इंदुरीकर महाराजांवर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी देखील या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशा प्रकरणाच्या बचावासाठी ज्या ग्रंथाचा आधार घेतला जातो, त्यासंबधी देखील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निवाड्याचा दाखला दिला जात आहे. तर संगमनेरमधील अंधश्रध्दा समितीच्या राज्य कार्यवाह Adv. रंजना गवांदे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात सोमवारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळाली.

इंदुरीकर समर्थकही मैदानात

इंदुरीकरांवरील आरोपामुळे त्यांचे समर्थकदेखील संतापले असून महाराजांच्या समर्थनासाठी हे सर्वजण सोशल मिडीयावर त्यांचे समर्थन करत आहे. त्यांच्या पाठीराख्यांकडून महाराजांच्या विधानाच्या समर्थनार्थ काही दाखले देखील दिले जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ संगमनेर-अकोलेतून अनेकजण एकवटले असून त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत महारांजांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

First Published on: February 14, 2020 5:56 PM
Exit mobile version