ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचाआरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचाआरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यात ग्रामीण भागात आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. यावेळी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला व बाल रुग्णालय यांच्या बळकटीकरणाकरिता आधुनिक यंत्रसामुग्री देणे, बांधकाम पूर्ण करणे, रिक्त पदांची तत्काळ भरती करणे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आज मालेगाव, जळगाव, पाचोरा, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, रायगड येथील आरोग्य संस्थांचा आढावा झाला. यावेळी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील ज्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचे बांधकाम ५० ते ६० टक्के पूर्ण झाले आहे अशा संस्थांची कामे पूर्ण होण्याकरिता निधीची उपलब्धता करुन देण्याबाबत वित्तमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या सेवा होणार सुरु

आज झालेल्या बैठकीत मालेगाव येथील १०० खाटांचे महिला रुग्णालय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येणार असून त्या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग, लसीकरण सुरु करावे. पुढील तीन महिन्यांत रुग्णालय पूर्णपणे सुरु होण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, डॉक्टर्स उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील म्हसावद, कऱ्हे, पाचोरा आदी विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाबाबत आढावा घेण्यात आला. यवतमाळ येथील महिला व बाल रुग्णालय सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले असून तेथे यंत्रसामुग्री पुरविण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

वरळी येथील राज्य कामगार रुग्णालयाबद्दल चर्चा

महाबळेश्वर, माथेरान या सारख्या पर्वतीय पर्यटनस्थळी आरोग्य व्यवस्था विशेष करुन हृदयविकार तसेच अपघातातील जखमींवर उपचारसंबंधी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खासगी संस्था, कॉर्पोरेटस यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपलब्ध करुन राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय यासारखी यंत्रसामुग्री बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी वरळी येथील राज्य कामगार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.

First Published on: February 12, 2019 8:48 PM
Exit mobile version