‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रातील थंडी होणार गायब

‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रातील थंडी होणार गायब

मागील काही दिवसांपासून राज्यभरात पडलेली थंडी सध्या गायब झाली आहे. काही दिवसांपूर्वी पहाटे थंड, दुपारी दमट पुन्हा संध्याकाळी थंड वातावरण होते. सातत्याने तापमानाचा पारा घसरत असल्याने गारठा वाढत होता. परंतु, आता लवकरच थंडी गायब होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार, राज्यात 15 फेब्रुवारीपासून हिवाळा संपण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (heat wave maharashtra cold will end from february 15 imd)

थंडी गायब होणार असल्यामुळे राज्यातील तापमानाच्या पारा चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्हयांचे कमाल तापमान 31 वरून एकदम 35 ते 36 अंशांवर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिवसा, रात्री व पहाटेचे किमान तापमानही वाढणार आहे. मागच्या पाच वर्षांत समुद्री वादळांची संख्या वाढल्याचेही सांगण्यात आले.

यंदा बंगालच्या उपसागरात असानी, मंदोस, सीतरंग ही चक्रीवादळे आली तसेच कमी दाबाचे पट्टे सतत तयार झाल्याने ढगाळ वातवरण निर्माण झाले. त्यामुळे हिवाळ्याचा कालावधी घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढीमुळे गारठा कमी होत आहे. तर कमाल तापमानाचा पारा देखील सातत्याने चढता आहे. आजही राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. बुधवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याशिवाय, जळगाव येथे तापमानाचा पारा 10.5 अंशांवर होता. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 19 अंशांच्या आसपास आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 35.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान 34 अंशांवर होते.


हेही वाचा – थोरातांचा वाद चिघळू देऊ नका, अन्यथा भाजपला आयती संधी मिळेल; ‘सामना’तून काँग्रेसला सल्ला

First Published on: February 9, 2023 11:24 AM
Exit mobile version