रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसाची हजेरी

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसाची हजेरी

मुसळधार पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश विभाग जलमय झाले आहे. रत्नागिरीतील चिपळूण शहरामध्ये पूराचे पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहरात बाजारपेठ, चिंचनाका, आईस फॅक्टरी, पोस्ट ऑफीस आणि वडनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. खेड तालुक्यातही पावसाने थैमान घातले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगडमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली असून महाड तालुक्यात जागोजागी पाणी साचले आहे.

रोह्यामध्येही पावसाने जनजीवन विस्कळीत 

रायगड जिल्ह्यातील रोह्यातील कुंडलिका नदी तुडूंब भरुन वाहू लागली आहे. नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. शुक्रवार, रात्रीपासून रोह्‍यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. रोहा नागोठणे मार्गावरील रहदारी बंद करण्यात आली आहे. दोन्ही पुलांच्या बाजूने पोलिस तैनात करणात आले आहेत. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्‍तव या मार्गावरील रहदारी बंद करण्यात आली आहे. रोह्‍यामध्ये गेल्‍या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. रोहा ते मुंबई पुणे अलिबागकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात देखील गेल्‍या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.

नागोठणे

महाड, नागोठणेत पाणीच पाणी 

महाड आणि पोलादपूर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा महाड शहरात पाणी शिरले आहे. मुख्य बाजारपेठ, दस्तुरी नाका हे परिसर जलमय झाले आहेत. या मार्गांवरची वाहतूक पर्यायी मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, असाच पाऊस नागोठणे भागातही पडतो आहे. या ठिकाणी शहरांमधल्या सखल भागात पाणी साठलं आहे. आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणे या ठिकाणीही पावसाचं पाणी शिरलं आहे.

First Published on: July 27, 2019 11:04 AM
Exit mobile version