रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे कोकणात सोमवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यातच हवामान खात्याने सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. तर मंगळवारी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खारेपाटणमध्ये पूरजन्य परिस्थिती आहे. येथील शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटण गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटणमधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे 5 फूटपेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले. उभे पीक पाण्याखाली गेले आहे. खारेपाटण चिंचवली मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. कणकवलीच्या गड नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत आले आहे.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून एक जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. राजापूरमधील जवाहर चौकात पाणी शिरले आहे. अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. काशिदजवळच्या नदीवरील पूल वाहून गेला आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यात गेल्या २४ तासांत ३४८ मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे मुरुड-आगरदांडा रोड पाण्याखाली गेला आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रात्रभर कोसळणार्‍या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे.

मुंबईतही पाऊसची रिपरिप

सोमवारी दिवसभर मुबंईत अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरात आणि बोरीवली परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. टाटा पॉवर या ठिकाणी 61 मिमी, चेंबूर आणि वडाळा परिसरात 42 मिमी, विद्याविहार आणि मीरा रोड परिसरात 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य भागात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

First Published on: July 12, 2021 11:28 PM
Exit mobile version