ठाण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

ठाण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाण्यातही २ दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्यामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली आहे.

ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, विजय गार्डन, कावेसर आणि सद्गुरु गार्डन सोसायटीच्या आवारात पाणी साचले आहे. सुदैवाने सदर घटनास्थळी कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच ठाणे महानगरपालिका परिसरातील सेक्टर क्रमांक ५, प्लॉट क्रमांक-६, श्रीनगर, वागळे इस्टेट येथील परिसरात नाला ओव्हर-फ्लो झाल्यामुळे देवरथी बंगल्याच्या आवारातही पाणी साचले आहे. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत ८.१२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ठाण्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. खड्ड्यांमध्ये देखील पाणी साचले आहे. बाजार पेठांमध्ये दररोजची गर्दी आणि वर्दळ पाहायला मिळते. मात्र, पावसामुळे संपुर्ण बाजारपेठांत शांतता निर्माण झाली आहे. अनाचक सुरू झालेल्या पावसाचा जास्त परिणाम शाळेतील विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि वाहन चालकांवर झाला आहे. कारण अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने ६ ऑक्टोबरपासून ते १२ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ठाणे, रायगड, पालघर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धुळे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : शिवसेना नोंदणीकृत पक्ष, राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का?, अरविंद सावंतांचा हल्लाबोल


 

First Published on: October 7, 2022 4:36 PM
Exit mobile version