उत्तर प्रदेशमध्ये पावसाचे थैमान; १५ जणांचा मृत्यू, १३३ इमारती जमीनदोस्त

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचे थैमान; १५ जणांचा मृत्यू, १३३ इमारती जमीनदोस्त

उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस

मागील तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील काही भागात मुसळधार पाऊस आणि तुफान वादळाने थैमान घातले आहे. त्यामुळे याठिकाणच्या जवळपास १३३ इमारती जमीनदोस्त झाल्या असून १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पुढील ५ दिवस लखनऊमध्ये हवामान ढगाळ राहून पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

अधिकृत माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये ९ जुलै ते १२ जुलै या चार दिवसाच्या कालावधीत झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफान वाऱ्याने येथील नागरिकांची खूप वाताहत झाली. या नैसर्गिक प्रलयात उत्तर प्रदेशमधील १३३ इमारती जमीनदोस्त झाल्या. तर १५ जणांना आपला जीव गमवावा लागला असून २३ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये उत्तर प्रदेशमधील उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबांकी, खीरी, गोरखपूर, कानपूर नगर, पिलीभीत, सोनभद्रा, चंडोली, फिरोझाबाद, मवू आणि सुलतानपूर या भागांची प्रचंड हानी झाली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज शनिवारी ते पुढील ५ दिवसांमध्ये लखनऊमधील हवामान काहीसं ढगाळ राहण्याबरोबर पावसाच्या एक-दोन तुरळक सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामाशानस्त्र विभागानुसार आज शनिवारी देशाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये उत्तराखंडातील दुर्गम भाग, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, कर्नाटकचा किनारी भाग, अरूणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरा यांचा समावेश आहे.

First Published on: July 13, 2019 9:02 AM
Exit mobile version