हिंजवडीत सॉफ्टवेअर कंपनीच्या महिला शौचालयात सापडला छुपा कॅमेरा

हिंजवडीत सॉफ्टवेअर कंपनीच्या महिला शौचालयात सापडला छुपा कॅमेरा

प्रातिनिधिक फोटो

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सॉफ्टवेअर कंपनीत महिलांच्या शौचालयात गुपचूप मोबाईल ठेवून महिला कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ काढणाऱ्या ऑफिसबॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंपनीत खळबळ उडाली आहे. विकास अंकुशराव घाडगे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ऑफिसबॉय फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास हा एका सॉफ्टवेअर कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. महिलांसाठीच्या शौचालयांची स्वच्छता करण्याची त्याला मुभा होती. शौचालयाची स्वच्छता करून छताच्या वरील बाजूस असणाऱ्या पीओपी टाईल्समधील मोकळ्या जागेत मोबाईल व्हिडिओ मोड ठेवून महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ घ्यायचा. एके दिवशी आरोपी विकास हा शौचालयात मोबाईल घेऊन जात असल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने पाहिले. तो बाहेर येताच शौचालयात जावून शहानिशा केली असता वरील बाजूस काळ्या रंगाचा मोबाईल आढळून आल्याने कंपनीत खळबळ उडाली. बिंग फुटल्याचे लक्षात येताच आरोपी विकास हा फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांचं एक पथक रवाना झालं आहे.

First Published on: June 15, 2019 7:37 PM
Exit mobile version