Holi 2024: सावधान! लोकल, बेस्ट बसवर होळीला फुगे माराल तर…

Holi 2024: सावधान! लोकल, बेस्ट बसवर होळीला फुगे माराल तर…

सावधान! लोकल, बेस्ट बसवर होळीला फुगे माराल तर...

मुंबई: होळी आणि धुळवडच्या निमित्ताने काही अतिउत्साही नागरिक लोकलवर तसंच बेस्टबसवरही फुगे मारतात. त्यामुळे फुगे लागल्याने प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी आता रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. (Holi 2024 Beware If you blow balloons on Holi on local best bus)

.. तर कायदेशीर गुन्हा नोंदवला जाणार

होळीसह धुळवडीच्या दिवशी लोकल ट्रेनवर रंग किंवा पाण्यानं भरलेले फुगे मारल्यास ते प्रवाशांना लागून त्यांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशी कृत्य न करण्याची ताकीद अतिउत्साहींना देण्यात आली आहे. फक्त रेल्वेच नव्हे, तर मुंबईतील बेस्ट बसवरही रंगांचे फुगे मारल्यास हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल.

सोशल मीडियावरून दिली ताकीद

रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून फुगे मारणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची ताकीद दिली आहे. तसंच, नागरिकांनी या नियमांचं उल्लंघन करू नये, असं स्पष्टपणे बजावण्यात आलं आहे. रंगपंचमीच्या दिवशी किंवा होळीनिमित्त बरीच मंडळी सुट्टी नसल्याकारणानं नोकरीवर जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडतात. पण, अशा वेळी काही अतिउत्साही लोक त्यांच्यावर पाण्याने भरलेले फुगे मारतात. आता मात्र अशा सर्व मंडळींना कायद्याच्या मदतीने धडा शिकवला जाणार आहे.

गेल्यावर्षी होळीदरम्यान लोकलवर फुगे मारण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. लोकलच्या दरवाजात उभे असणाऱ्या प्रवाशांसह खिडकीलगत बसलेल्या प्रवाशांना या घटनांमुळे हानी पोहोचण्याची शक्यता असते. होळीपूर्वी आणि होळीनंतर अशा घटना घडत असतात. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून लोकलवर फुगे मारू नयेत, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील निला यांनी केलं आहे.

(हेही वाचा: Supriya Sule : आमदार रोहित पवारांसह युगेंद्र पवारांना संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंचे पुणे पोलिसांना पत्र)

First Published on: March 22, 2024 10:01 AM
Exit mobile version