शॉर्ट सर्कीटमुळे संपूर्ण घर जळून खाक!

शॉर्ट सर्कीटमुळे संपूर्ण घर जळून खाक!
खेड तालुक्यातील आढे येथे राहणाऱ्या धोंडू सत्तू सावंत यांच्या घराला अचानकपणे आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, या आगीत सावंत यांच्या घरातील कपडे, भांडी, गहू, तांदुळ, दागिने व रोख रक्कम आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे सावंत कुटुंबियांचे अंदाजे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री १०:२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रात्री जेवण करुन घरातील सर्वजण झोपी गेले होते. तर, सावंत यांची मुलगी दहावीचा अभ्यास करत बसली होती. एकाएकी  घराला आग लागल्याचे तिच्या  लक्षात आल्याने आरडाओरडा करुन घरातील सर्वांना जागं केलं. तिच्या आरडाओरडीमुळे ग्रामस्थही त्याठिकाणी जमले. दरम्यान, सर्वांनी पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग लवकर आटोक्यात न आल्यामुळे घरातील बहुतांशी वस्तूंचे नुकसान झाले.
दरम्यान, सावंत यांची परिस्थिती बेताची असल्याने या अपघातामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. संपूर्ण घर जळून खाक झाल्यामुळे आता पैशाअभावी घराची दुरुस्ती कशी करणार? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निधीतून तसंच महावितरणकडून सावंत यांना मदत केली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
6 Attachments
First Published on: February 6, 2019 3:02 PM
Exit mobile version