शॅडो कॅबिनेटची ‘मूळ’ संकल्पना इंग्रजांची

शॅडो कॅबिनेटची ‘मूळ’ संकल्पना इंग्रजांची

इंग्ल्ंडकडून शॅडो कॅबिनेटची संकल्पना पुढे

बॅ. विठठ्लराव गाडगीळ आज हयात नाहीत. त्यांनी त्यांच्या भाषणात व लिखाणात युरोपादी देशांतील शॅडो कॅबिनेटची माहिती अनेकदा दिली आहे. ती रंजक आहे. राज्यातील शॅडो वाल्यांनी ती समजून घेतलेली दिसत नाही अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाच्या नेत्याला जे महत्व प्राप्त झाले आहे ते शॅडो कॅबिनेटमुळेच. इंग्लंडमधील विरोधी पक्षाच्या नेत्याला इतके महत्व येण्याचे प्रमुख कारण म्हणजे १९५५ सालापासून शॅडे कॅबिनेट आणि विरोधी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते (ऑपोझिशन स्पोक्समन) यांचे महत्व वाढले आहे.

एकोणिसाव्या शतकात हुजूर आणि उदारमतवादी मंत्रिमंडळातील मंत्री सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून काम करताना किंवा कामाची आखणी करण्यासाठी वेळोवेळी भेटत असत. मंत्रीमंडळासारख्या त्यांच्या बैठकी भरत असत. या अनौपचारिक बैठकांतूनच छाया मंत्रीमंडळाच्या कल्पनेचा जन्म झाला. या शतकात छाया मंत्रीमंडळाला अधिकाधिक औपचारिक स्वरूप येऊ लागले. हुजूर पक्ष विरोधात असला म्हणजे त्यांचा नेता छाया मंत्रीमंडळाचे सभासद नेमतो. मजूर पक्षात संसदीय पक्ष या नेत्याची निवड करतो. त्यांच्या नियमितपणे औपचारिक बैठका होतात. त्याची माहिती वृत्तपत्रांना दिली जाते. १९५१ सालामध्ये मजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून काम करताना धोरणात्मक प्रश्नावर निरनिराळे खासदार निरनिराळी मते व्यक्त करून लागले.

पक्षाच्या खासदारांनीच एका आवाजात बोलावे अशी मागणी वाढत गेली आणि जुलै १९५५ मध्ये पक्षाच्या एका बैठकीनंतर मजूर पक्षाचे नेते श्री एटली यांनी २५ निरनिऱाळ्या विषयांवरील मजूर पक्षाच्या ३९ अधिकृत प्रवक्त्यांची नावे जाहीर केली. धोरणात्मक प्रश्नावर हे प्रवक्तेच मजूर पक्षाच्या अधिकृत दृष्टीकोन संसदेत मांडू लागले. मजूर पक्ष १९६४ पर्यंत म्हणजे १३ वर्षे विरोधी पक्ष म्हणून काम करत होता. अधिकृत प्रवक्त्यांची ही पद्धत त्या काळात इतकी रूढ झाली की १९६४ मध्ये हुजूर पक्ष विरोधी पक्ष झाल्यावर त्या पक्षाच्या नेत्यानेही शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून अधिकृत प्रवक्ते नेमण्यास सुरूवात केली आणि या नेमणुकांचे महत्व वाढले. परिणाम असा झाला की, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची पक्षांतर्गत सत्ता आणि महत्व अधिक वाढते. या शॅडो कॅबिनेटच्या बैठका विरोधी पक्षाच्या अधिकृत नेत्याच्या अध्यक्षतेखालीच होतात. या बैठकांत कोणत्या विषयावर चर्चा व्हावी हे तो ठरवतो. महत्वाच्या विषयात सदनात आपला पराभव होणार नाही किंवा आपला प्रतिस्पर्धी अधिक बळकट होणार नाही अशा रीतीने तो चर्चेला वळण लावतो.

First Published on: March 11, 2020 10:20 AM
Exit mobile version