Bmc News Today : मुंबईकरांसाठी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे बांधकाम करणार – महापालिका आयुक्त

Bmc News Today : मुंबईकरांसाठी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे बांधकाम करणार – महापालिका आयुक्त

मुंबई : मुंबईत रस्ते वाहतुकीदरम्यान वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांचे अपूरे बांधकाम आणि खड्ड्यांमुळे निश्चित स्थळी पोहोचण्यात प्रचंड उशीर होतो. त्यामुळे मुंबईकरांच्या भविष्यासाठी मुंबईतील रस्त्यांचे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि आयआयटी मुंबई संस्था यांनी संयुक्तपणे मुंबई महानगरासाठी सर्वोत्तम नागरी उपाययोजना करणे ही गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांची अत्युच्च दर्जोन्नती, कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महापालिकेच्या अभियंत्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी पवईत असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथे एकदिवसीय विचारमंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (Mumbai Bmc News Today Will build quality quality roads for the future of Mumbaikars Says bmc Commissioner bhushan gagrani)

“आगामी काळात मुंबईकरांसाठी महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी अभियंत्यांसोबत विचारमंथन करणारी कार्यशाळा देखील त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबईकरांना पुरवण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरी सेवा सुविधांचा एक भाग म्हणून रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे रस्ते अत्युच्च गुणवत्तेचे असणे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. म्हणून आयआयटी मुंबई सारख्या संस्थेकडून अभियंत्यांसोबत विचारमंथन करून, केले जाणारे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. अशा संयुक्त कामगिरीमुळे मुंबईच्या भविष्यातील गरजांसाठी महानगरपालिका अधिक सक्षम संस्था आहे, ही भावना आणि आत्मविश्वास नागरिकांमध्ये वाढीस लागण्यासाठी नक्कीच मदत होईल”, असे प्रतिपादन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.

“मुंबई महापालिका क्षेत्रात सिमेंट कॉंक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. कोणताही प्रकल्प बांधताना त्यामध्ये गुणवत्तेबाबत आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे असते. त्यासाठी प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या घटकांसोबत चर्चा करून विचारमंथन होणे आवश्यक ठरते, जेणेकरून अडचणी असल्यास त्या योग्यरीत्या सोडवता येतात. हाच विचार नजरेसमोर ठेवून ही विचारमंथन कार्यशाळा होत असून त्याचा नक्कीच फायदा होईल. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण केल्यानंतर त्याचे आयुर्मान 10 वर्षांच्या दोषदायित्व कालावधी (DLP) पुरते मर्यादीत न राहता किमान 20 पेक्षा अधिक वर्षे टिकून रहावे, अशा दृष्टीने नियोजन करून ही रस्ते बांधणी होणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेतील विचारमंथनाचा लाभ करून घ्यावा”, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले.

हेही वाचा – Mumbai News: मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट? आयुक्त म्हणाले, पाणीटंचाई…

मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे करताना निर्माण होणारी आव्हाने, याबाबत अभियंत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. सिमेंट कॉंक्रिट आणि खडी वाहून आणणारी वाहने तसेच रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट यामधील अंतर, मुंबईतील वाहतूक कोंडी, हवामान यासारखी विविध आव्हाने असल्याचे अभियंत्यांकडून नमूद करण्यात आले. त्यासोबत वाहतूक कोंडीमुळे सिमेंट खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण यासाठी मुंबईतील वातावरण, वाहतूक कोंडी यासारखे घटक कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. रस्त्याची कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मिळणारी परवानगी तसेच मुंबई महानगरात असणारे मॅनहोल्सचे जाळे ही देखील विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यासाठीची आव्हाने असल्याचा अभिप्राय अभियंत्यांनी दिला. दमट वातावरण तसेच वाहतूक कोंडी यासारखी आव्हाने पाहता अधिकाधिक कॉंक्रिटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत करण्याचे आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी सुचवले.

आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या डिझायनिंगच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाबाबतची माहिती आणि निकष यांची मांडणी केली. तसेच मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ याअनुषंगाने विचार करून सुयोग्य तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतील मृदा परिक्षणाची अद्यावत आकडेवारी वापरणे शक्य आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती आणि आकडेवारी लक्षात घ्यावी. चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याचे आयुष्यमान वाढ होवू शकते, यासह इतर आवश्यक बाबींचाही त्यांनी उहापोह केला. तसेच प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी विविध स्वरूपाच्या चाचण्यांचा समावेश करण्यावरही त्यांनी भर दिला.

सिमेंट काँक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांवर पडणाऱ्या भेगांसाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानांचीही त्यांनी माहिती दिली.


हेही वाचा – Weather Update : कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता; मुंबई, ठाण्याचाही पारा चढणार

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 28, 2024 3:07 PM
Exit mobile version