धारावीतील शेकडो एकर जमीन उद्योगपतीच्या घशात घातली; पटोलेंचा सरकारवर आरोप

धारावीतील शेकडो एकर जमीन उद्योगपतीच्या घशात घातली; पटोलेंचा सरकारवर आरोप

मुंबई : धारावी पुनर्विकासाच्या  प्रकल्पासाठी भाजप सरकारने शेकडो एकर मोलाची जमीन ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीच्या घशात घातली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी बुधवारी केला. यासाठी कोणती निविदा  प्रक्रिया पार पाडण्यात आली. कशाच्या आधारावर एवढी मोलाची जमीन देण्यात आली? राज्य आणि  केंद्र सरकारने इतक्या अचानकपणे ही प्रक्रिया कशी पार पाडली? असे सवालही पटोले यांनी केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये उद्योगपती गौतम अदानी समूहाची ५ हजार ६९ कोटी रुपयांची बोली सरस ठरली आहे. त्यामुळे धारावी प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळेल हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी धारावी प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या.

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी दुबईच्या सी-लिंक कंपनीने ७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा भरली होती,  पण नंतर सरकरने ती रद्द केली. ह्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे? आणि आता ५ हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीला ह्या प्रकल्पाचे काम कसे काय दिले? महाराष्ट्र सरकारने रेल्वेच्या जमिनीसाठी ७०० कोटी रुपये दिले होते.  पण त्यावेळी रेल्वेने महाराष्ट्र सरकारला जमीन दिली नाही.  आता असे काय घडले की ही जमीन राज्य सरकारला दिली? याची उत्तरे जनतेला दिली पाहिजेत. हिवाळी अधिवेशनात आम्ही याप्रश्नी  सरकारला जाब विचारणार आहोत, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकातील भाजपचे सरकार  जाणीवपूर्वक सीमाभागातील  वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही.  महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे.  पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक आणि  केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पटोले यांनी दिला.  सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपचे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सीमा भागात कर्नाटककडून होत असलेले हल्ले गंभीर असून आम्ही या भ्याड हल्ल्यांचा निषेध करतो. केंद्रातील मोदी सरकार आणि  काही उद्योपतींच्या इशाऱ्यावर कर्नाटक अशा कुरापती काढत आहे. वास्तविक पाहता दोन राज्यात वाद उद्भवल्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन तो सामोपचाराने सोडवला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दररोज भडकाऊ विधाने करत आहेत. पण महाराष्ट्र सरकारकडून त्याला उत्तर दिले जात नाही. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असे वाटावे, अशी परिस्थिती आहे. आपण मोदी-शहा यांचे हस्तक आहोत हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे.  त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत.  पण महाराष्ट्राची जनता आणि काँग्रेस पक्ष कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही. वेळ पडली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.


हेही वाचाः पेण अर्बन बॅंकेतील ठेवीदारांना पैसै मिळणार परत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ कडक निर्देश

First Published on: December 7, 2022 8:35 PM
Exit mobile version