मला चक्रव्यूहात अडकविले जात आहे

मला चक्रव्यूहात अडकविले  जात आहे

मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रत्येक पक्षातील मोठे नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य तितके आपले योगदान देत आहेत. याच उत्साही वातावरणात नांदेडमध्ये राजकीय वातावरणाला भावनिक किनार मिळाल्याचे पाहायला मिळाले. एका प्रचारसभेमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे भावनिक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. प्रदेशाध्यक्षपदी असतानाही नांदेडबाहेर निघण्याची संधी चव्हाण यांना मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनीच आपल्याला अडकवले जात असल्याचे वक्तव्य केले.

‘मला चक्रव्यूहात अडवले जात आहे. मी तुमच्यासोबत जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार’, असे यावेळी म्हणत त्यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष दिल्याचे पहायला मिळत आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये एकूण तीन प्रचारसभा घेतल्या. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही एक सभा नांदेडमध्ये झाली होती. भाजपकडून घेण्यात आलेल्या या सभांना चांगला प्रतीसादही मिळाला होता.

भाजप सध्या नांदेडमध्ये जास्त लक्ष घालत असून खुद्द पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हेसुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून इथेच तळ ठोकून आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही नांदेडवरच लक्ष देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे इथे दोन्ही पक्षांच्या प्रचारामध्येही चांगलीच खडाजंगी जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाणही गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्येच असून, येथील मतदार संघांमध्ये ते स्वत:प्रचारासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.

First Published on: April 15, 2019 4:56 AM
Exit mobile version