मला अजित पवारांची जागा घ्यायची नाही – जितेंद्र आव्हाड

मला अजित पवारांची जागा घ्यायची नाही – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर अचानक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे तर अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. ठाण्यातही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन केले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याच दिवशी ट्विट केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे समजले जात होते. याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना एका वृत्तवाहिनीने मुलाखतीत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “अजित पवारांच्या विरोधात माझे वैयक्तिक भांडण नाही. आमचे शेत काही शेजारी शेजारी नाही किंवा मला त्यांची जागाही घ्यायची नाही. अजित पवार आमचे नेते आहेत. २३ नोव्हेंबरच्या दिवशी अॅक्शनला रिअॅक्शन म्हणून कार्यकर्ते आक्रमक झाले होते.”

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप झाला होता. त्याचदिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेत्यांनी एकत्र येत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. तर जितेंद्र आव्हाड यांनी “मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत, मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा” अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर अजित पवारांच्या विरोधात लिहायला सुरुवात केली होती. याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, “कार्यकर्त्यांची कृती ही अॅक्शनला रिअॅक्शन होती. अजित पवार हे परिपक्व नेते आहेत. त्यांना सुद्धा या गोष्टी माहीत आहेत.”

अजित पवार आता आमचे नेते

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्यानंतर केवळ दोन दिवसांत पुन्हा राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनीच ‘We Love you Dada’ अशा मजकुराचे फलक हाती घेतले होते. अजित पवार यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाईही केलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार हे आमचे नेते असल्याचे म्हटले आहे.

First Published on: December 11, 2019 3:20 PM
Exit mobile version