मी या सरकारचा ना हेडमास्तर ना रिमोट कंट्रोल – शरद पवार

मी या सरकारचा ना हेडमास्तर ना रिमोट कंट्रोल – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार हे हेडमास्तर आणि रिमोट कंट्रोल आहेत अशी टीका होत असताना खुद्द शरद पवार यांनी याचे उत्तर दिले असून, मी हेडमास्तर किंवा रिमोट कंट्रोल दोन्ही नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलखात घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी हे भाष्य केले. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोट चालते कुठे? जिथे लोकशाही नाही तिथं! आपण रशियाचे उदाहरण पाहिले. पुतीन २०३६ पर्यंत अध्यक्ष राहणार. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सगळे बाजूलाच केलेले आहे. त्यामुळे आपण म्हणू त्या पद्धतीने सरकार चालवले पाहिजे हा अट्टहास आहे, पण इथे लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही असे पवार म्हणालेत.

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात तुम्ही वेळ कसा घालवला असा प्रश्न संजय राऊत यांनी शरद पवार यांना विचारला असता शरद पवार यांनी आपण केवळ घरी बसून टीव्ही पाहिला आणि वाचन केल्याचे सांगितले. तसेच ‘पहिला एक दीड महिना मी माझ्या घराच्या चौकटीच्या बाहेरसुद्धा गेलो नाही. साधा अंगणातही गेलो नाही. त्याला अनेक कारणे आहेत. एकतर घरातून प्रेशर होते. त्यानंतर तज्ज्ञांनी सांगितले त्याप्रमाणे ७० ते ८० हा जो काही वयोगट आहे त्या गटाला अत्यंत काळजी घेणं गरजेचे आहे. मी त्याच वयोगटात येतो. त्यामुळे घरच्यांचा आग्रह, नाही म्हटले तरी मनावरील दडपण यामुळे मी त्या चौकटीच्या बाहेर काही गेलो नाही.’


हेही वाचा – पारनेरमधील सेनेच्या नगरसेवकांची विजय औटींविरोधात तक्रार


 

First Published on: July 11, 2020 9:46 AM
Exit mobile version