IAS अधिकारी सुनील केंद्रेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती; शासनाकडून अर्ज मान्य

IAS अधिकारी सुनील केंद्रेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती; शासनाकडून अर्ज मान्य

छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सुनील केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली होती. धडाकेबाज IAS अधिकारी अशी केंद्रेकर यांची ओळख आहे. केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु औरंगाबाद खंडपीठाकडून केंद्रेकरांचा अर्ज न स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सुनील केंद्रेकर यांचा अर्ज शासनाकडून मान्य करण्यात आला असून ते स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत.

सुनील केंद्रेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती

मागील महिन्यात सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे व्हीआरएससाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या निर्णयावर औरंगाबाद खंडपीठाने मोठा निर्णय घेतला होता. केंद्रेकरांनी दिलेल्या स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज सरकारने स्वीकारू नये, असा आदेश दिला होता. मार्च २०२४ पर्यंत केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज स्वीकारु नये, असं न्यायालयाने म्हटलं होतं. पण आज त्यांचा अर्ज शासनाकडून मान्य करण्यात आला आहे.

केंद्रेकरांनी असा निर्णय का घेतला?

राज्यातील काही मोजक्या आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत.

बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली आणि संपूर्ण बीड त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. केंद्रेकर हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र, स्वेच्छानिवृतीच्या अर्जामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.


हेही वाचा : मोदींचा पराभव करण्यासाठी नाना पटोलेंचे नारीशक्तीला आवाहन, म्हणाले…


 

First Published on: June 27, 2023 5:14 PM
Exit mobile version