सॅनिटायझरचा अतिवापर देखील आरोग्यासाठी हानीकारक – डॉ. राजेंद्र शिंगणे

सॅनिटायझरचा अतिवापर देखील आरोग्यासाठी हानीकारक – डॉ. राजेंद्र शिंगणे

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

सॅनिटायझरचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांनी केले आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर अनेक लोकांनी औषधाच्या दुकानाबाहेर सॅनिटायझर विकत घेण्यासाठी रांगा लावल्या. लोकांनी गरजेपेक्षा जास्त सॅनिटायझर विकत घेतल्यामुळे काही लोकांनी बनावट सॅनिटायझर रातोरात उत्पादित केले. मात्र हे सॅनिटायझरचा अतिपावर करत असाल तर तो आरोग्यास हानीकारक ठरू शकते, असे वक्तव्य डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, जिथे आवश्यक आहे त्याच ठिकाणी हँड सॅनिटायझर वापरले पाहीजे. अन्यथा तुमचे हात पांढरे पडू शकतात, त्यावर छोटे छोटे फोड येण्याची शक्यता असते. जे लोक अनेकदा हात मिळवतात किंवा वस्तूंना वारंवार हात लावतात त्यांनीच सॅनिटायझर वापरावे. तसेच दिवसातून चार किंवा पाच वेळाच सॅनिटायझर वापरावे, असा सल्लाही शिंगणे यांनी दिला आहे.

२१ ते २२ कारवाया करुन बनावट सॅनिटायझर जप्त केले आहेत. पुढच्याही काळात अन्न व औषध प्रशासनामार्फत धाडी टाकल्या जाणार आहेत. करोनाची धास्ती वाढल्यानंतर लोकांनी सॅनिटायझरचा साठा केला होता. तसेच शाळांना सुट्ट्या दिल्यामुळे आता पुढच्या काळात सॅनिटायझर उपलब्ध होऊ शकेल. कारण काही शाळांनी सॅनिटायझर बंधनकारक केले होते. म्हणून सॅनिटायझरची कमतरता जाणवत होती, असेही राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

कच्चा माल पुरविणार

उत्तम प्रतीचे हँड सॅनिटायझर बनविण्यासाठी अल्कोहोलची गरज लागते. ज्या कंपन्या आधीपासून सॅनिटायझर उत्पादित करत होत्या, त्यांना अल्कोहोल पुरवले जाईल. सॅनिटायझरचे पॅकिंग मटेरियल हे चीनवरुन येत होते. कारण आपल्याकडे प्लास्टिक बंदी केलेली आहे. मात्र चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यापासून चीनमधून आयात बंद केलेली आहे. त्यामुळे साधे पॅकिंग करुन सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्याबाबत आदेश देण्यास सांगितले आहे. तसेच इतर राज्यातून देखील सॅनिटायझर मागविण्यात आल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

First Published on: March 18, 2020 10:35 AM
Exit mobile version