“हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा…”, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde यांना आव्हान

“हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा…”, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde यांना आव्हान

मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात, राऊतांचा शिंदेंसोबत भाजपावरही निशाणा

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी 10 जानेवारीला घोषित करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाप्रमाणेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाचा असल्याचा निर्णय दिला आहे. बहुमताच्या आधारावर विधानसभा अध्यक्षांकडून हा निकाल देण्यात आल्याने शिंदे गटाकडून या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला. तर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाविरोधात आता ठाकरे गटाकडून चिरफाड करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या निकालाचे वाचन ठाकरे गटाकडूनही करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी जो काही निकाल लावला त्या निकालाविरोधात आता ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वतःचा पक्ष काढण्याचे आव्हान देखील दिले आहे. (“If you dare, form your own party…”, Sanjay Raut challenges CM Eknath Shinde)

हेही वाचा… Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”

प्रसार माध्यमांसमोर संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हणाले की, जो निकाल दिला गेला आहे, त्याविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातोय. विधानसभा अध्यक्ष यांची अंत्ययात्रा काढल्या जात आहेत, ही लोकशाहीची अंत्ययात्रा असल्याची भावना जनतेच्या मनात आहे. अत्यंत खोटेपणाचा कळस हा निकाल आहे. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्ष पदावरील ही व्यक्ती निष्पक्ष असते पण, राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचा उल्लंघन केले आहे. त्यामुळे या सर्वाची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद घेणार आम्ही घेणार आहे. विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघतेय, तिरडी बांधून लोक स्मशानाकडे का निघाले आहेत, हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणारे नसले तरी, हे का घडत आहे, या निकालाची चिरफाड करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत. वरळी येथे 16 जानेवारीला दुपारी 4 वाजता डोमखाली उध्दव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार आहेत.

तर, पक्ष आहे म्हणून आम्ही दौरा करत आहोत. पक्ष जागेवर आहे, कार्यकर्ते जागेवर आहेत, शिवसैनिक जागेवर आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय. तुमचे मुख्यमंत्री काहीही बोलू दे. त्यांचा पक्ष कुठे आहे. चोरलेला पक्ष, चोरीचा माल, हापापाचा पक्ष, तो तुमचा पक्ष आहे. हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष उभा करा, स्थापन करा आणि मग बोला. चोरलेल्या पक्षावर डिंग मारु नका, असे आव्हानच संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचे आव्हान केले आहे. कोणी काकाचा पक्ष चोरत आहे, तर कोणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरत आहे. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढून निवडणूक लढवा. दिल्लीत बसलेल्या अनौरस बापाच्या जीवावर पक्ष चोरू नका, असा हल्लाबोल राऊतांनी यावेळी केला.

First Published on: January 14, 2024 11:50 AM
Exit mobile version