सावरकरांशी लढायचे की मोदींशी

सावरकरांशी लढायचे की मोदींशी

नवी दिल्ली –  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी झालेली 2 वर्षांची शिक्षा आणि पाठोपाठ त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील हितसंबंधांविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळेच राहुल गांधींवर कारवाई झाल्याचे म्हणत विरोधकांनी याप्रश्नी भाजपविरोधात एकवटण्याचे ठरविले आहे, परंतु राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करण्यात येणार असतील तर या आघाडीत बिघाडी होईल. आपल्याला सावरकर यांच्याशी लढायचे आहे की नरेंद्र मोदींशी लढायचे हे ठरवा. भाजपचा सामना करायचा असेल तर आपसात मतभेद असून चालणार नाहीत, असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना दिल्याचे समजते.

खासदारकी रद्द झाल्यानंतर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सावरकर नसून मी गांधी आहे. मी माफी मागणार नाही, असे वक्तव्य करीत राहुल गांधींनी नाहक वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातही भाजप-शिवसेनेकडून ठाकरे गटाला लक्ष्य केले जाऊ लागले आहे. भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी सातत्याने सावरकरांविरोधात अवमानकारक वक्तव्य करीत असल्याने हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्यावरून ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान त्यांना भाजप-शिवसेनेकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावच्या जाहीर सभेत सावरकर आमचे दैवत असून सावरकरांची बदनामी सहन करणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

दरम्यान, काँग्रेसने सोमवारी सायंकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांसाठी डिनर आयोजित केले होते. त्याआधी झालेल्या बैठकीत अदानी घोटाळ्यावरून संयुक्त संसदीय समितीचा मुद्दा लावून धरण्याची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला 18 पक्षांचे नेते उपस्थित होते, परंतु सायंकाळच्या डिनरला उद्धव ठाकरे गट आणि तृणमूल काँग्रेसचे नेते गैरहजर राहिले. ठाकरे गट सावरकरांच्या मुद्यावरून नाराज असल्याने ठाकरे गटाचे खासदार डिनरमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही – शरद पवार

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सावरकरांविषयीच्या अवमानकारक वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडला. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्याला मित्रपक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शविली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांच्या मताचा आपण आदर करीत असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे म्हटल्याने राहुल गांधी आता सावरकरांविषयी बोलणे टाळणार का, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सावरकरांचा राजकारणासाठी वापर दुर्दैवी – रणजित सावरकर

गेल्या काही दिवसांपासून सावरकरांवर राजकीय वर्तुळात जी काही चर्चा सुरू आहे ती दुर्दैवी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांचा वापर केवळ राजकारणासाठी करीत आहेत. त्यांना वाटते की सावरकर हिंदुत्ववादी प्रेणेते असल्यामुळे त्यांना विरोध केला तर मुसलमान आपल्या पाठीशी उभे राहतील. राहुल गांधींसोबत काही हिंदुत्ववादी पक्षसुद्धा त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करीत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी नोंदविली.

First Published on: March 29, 2023 5:29 AM
Exit mobile version