गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणांबाबत सखोल चौकशी

गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणांबाबत सखोल चौकशी

अनावश्यक शस्त्रक्रिया करून गर्भपिशव्या काढण्याच्या बीडच्या गंभीर प्रकरणाची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे. शिवाय, या प्रकरणांमध्ये काही हॉस्पिटलचा उल्लेख झाल्याने प्रशासनाने त्याची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय चार सदस्यीय समितीने गर्भ पिशवी शस्त्रक्रिया प्रकरणाच्या चौकशीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात या शस्त्रक्रियेमुळे पीडित असलेल्या जिल्ह्यातील ६० ते ७० महिलांशी चौकशी केली.

शस्त्रक्रियेनंतर महिलांना पोटदुखीसारखे त्रास

चौकशी समिती सदस्य आमदार विद्या चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख आणि जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत या महिलांपैकी ७ महिलांनी त्यांची शस्त्रक्रिया वयाच्या २०, २२ आणि २५ वर्ष यादरम्यान झाल्याचं सांगितलं. तसंच, यावेळी महिलांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील पोट दुखणे किंवा विविध शारीरिक आणि आरोग्यविषयक तक्रारींचा त्रास होत असल्याचे नमूद केलं.


हेही वाचा – ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढणार्‍यांवर कारवाई करणार

‘त्या’ हॉस्पिटलचा वारंवार उल्लेख

चौकशीत या महिला वारंवार ठराविक हॉस्पिटलचा उल्लेख करत असल्याने याची सखोल चौकशी करून अहवाल प्रशासनाने सादर करावा, तसेच याप्रश्नी आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

First Published on: July 18, 2019 9:55 PM
Exit mobile version