“मी पुन्हा येईन म्हणायला भीती वाटते”, अमोल कोल्हेंचा खोचक टोला; रोख कोणाकडे?

“मी पुन्हा येईन म्हणायला भीती वाटते”, अमोल कोल्हेंचा खोचक टोला; रोख कोणाकडे?

मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल मला भीती वाटते. तयारी तशीही सुरूच आहे. माणूस महत्त्वाचा नाही, पक्ष महत्त्वाचा आहे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

राज्यातील सर्वच राजकीय पक्ष हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा करण्यात येत होती. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही बोलण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी देखील या लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने मात्र मोठा प्रश्न निर्माण झाले आहे. पण आता अमोल कोल्हे आणि विलास लांडे या दोघांनीही आपापले मते बदलल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहेत.

आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, विलास लांडे यांच्यासह काही स्थानिक प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर आणि कामांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन असे म्हणायला भिती वाटते असे म्हणत टीका केली. तर शरद पवार जे सांगतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण असे म्हणत त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधळूण लावले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शरद पवारांनी आज शिरूर मतदारसंघातल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. २०१९ साली मी इथली निवडणूक ३ मुद्द्यांवर लढवली होती. बैलगाडा शर्यती, पुणे-नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि पुणे-नाशिक रेल्वे या तीन मुद्द्यांचा समावेश आहे. चार वर्षांत बैलगाडा शर्यत आणि पुणे नाशिक महामार्गावरची कोंडी हे दोन प्रश्न सुटले आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प भूसंपादन आणि कॅबिनेटच्या मंजुरीपर्यंत पोहोचला आहे. हा आढावा शरद पवारांसमोर मांडला.”

मी पुन्हा येईन म्हणायला आजकाल मला भीती वाटते. तयारी तशीही सुरूच आहे. माणूस महत्त्वाचा नाही, पक्ष महत्त्वाचा आहे. अंतिमत: पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल, असे म्हणत त्यांनी ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे सूचविले आहे. तर पुढील काळात काम करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. अंतिम निर्णय पक्ष ठरवेल. शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण. त्यामुळे इतर कुणीही अकारण चर्चा करू नयेत. कलाक्षेत्रात मी काम करत असतो. यात राजकीय भूमिका सोडून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे त्यातून अकारण कुठलेही अर्थ काढू नयेत, अशी माझी विनंती आहे,” असे सांगत कोल्हे यांनी ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले आहे.

कलाक्षेत्रात सक्रीय असताना राजकीय क्षेत्रात सक्रीय असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला मी पहिलाच आहे. त्यामुळे अपेक्षाही जास्त असणार. उपलब्ध असणारा वेळ तितकाच कमी आहे. तसेच माझ्या माहितीनुसार सर्वोत्तम जनसंपर्क काय असू शकतो, हे त्यांनी दाखवलंय. मला ते शिकण्याची इच्छा आहे. मतदारसंघात अनेक लोकांची खडान् खडा माहिती त्यांच्याकडे असते, असे म्हणत त्यांनी विलास लांडे यांच्या जनसंपर्काचे कौतुक केले.

First Published on: June 5, 2023 3:12 PM
Exit mobile version