राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

राज्यातील अनेक भागात पावसाच्या हजेरीला सुरूवात झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने राज्यातील अवकाळी पाऊस सुरू झालेल्या भागांची माहिती प्रसिद्ध केली आहे. येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागेल असेही विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील काही भागात ढगांची चांगलीच गर्दी झाल्याचे फोटो हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मुख्यत्वेकरून मध्य महाराष्ट्रात ढगांची गर्दी पहायला मिळत आहे. नाशिकच्या दिंडोरी परिसरातही काही तासांपूर्वीच पावसाची नोंद झाल्याचे पहायला मिळाले. तर काही भागात तुरळक पावसाची हजेरी लागली असल्याची माहिती आहे.

नाशिकमध्ये तुरळक पावसाची हजरेली लागली आहे. त्यासोबतच पुणे, नंदुरबार, अहमदनगर, जुन्नर तसेच सातारा परिसरात पावसाची हजेरी लागली असल्याची माहिती आहे. ही हजेरी मोठी नसली तरीही या अवकाळी पावसाचा परिणाम हा शेतीवर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यात धुळे, जळगाव यासारख्या भागातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. शेतकऱ्यांसाठी आगामी पाच दिवसांचा अलर्ट हवामान विभागाकडून याआधीच वर्तवण्यात आला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले होते.

पुणे तसेच सातारा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. साधारणपणे ताशी ३० किमी ते ४० किमी या वेगाने वारे या भागात वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. राज्यातल्या निफाड, नाशिक, कराड यासारख्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच येत्या तीन ते चार तासांमध्ये पावसाचा अंदाज या भागासाठी वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजेच्या कडक़डाटासह पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात ढगांची गर्दी पहायला मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

First Published on: March 20, 2021 5:49 PM
Exit mobile version