सुशांत मृत्यू प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकारने राजकीय अजेंड्यासाठी वापर केला – सचिन सावंत

सुशांत मृत्यू प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकारने राजकीय अजेंड्यासाठी वापर केला – सचिन सावंत

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण राज्यासह देशात चांगलंच गाजलं. वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा सुशांतच्या मृत्यूचा तपास करत होते. सीबीआय देखील यामध्ये तपास करत होती. सीबीआय चौकशीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सीबीआयने अद्याप यावर काही भाष्य केलेलं नाही. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आरोप केले आहेत. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकारने त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी वापर केला, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंग राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेतल्यापासून आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. परंतु गुप्तेश्वर पांडेंचा वापर भाजपच्या राजकीय अजेंड्यासाठी केला जात होता. जो मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि MVA सरकार अस्थिर करण्यासाठी होता. भाजपने उघडपणे खूनाचा, बलात्काराचा अँगल देत बिहार निवडणुकीत सुशांतच्या मृत्यूचा वापर जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन करता येईल तेवढा केला, अशी घणाघाती टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारवर नियोजितपणे हल्ला करण्यात आला. काही वृत्त वाहिन्या देखील यात सहभागी होत्या. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत राहिले. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, एफबी आणि यूट्यूब अकाउंट तयार केले, असं सचिन सावंत म्हणाले.

एम्स पॅनेलने हत्येला नकार देऊन आता ३०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय मुद्दाम मौन पाळत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासाची ही चेष्टा मोदी सरकारकडून त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी कशी वापरली जात आहे याचे उत्तम उदाहरण आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

 

First Published on: August 5, 2021 10:13 AM
Exit mobile version