उरणकरांचा 3 किलोमीटरचा हेलपाटा वाचला

उरणकरांचा 3 किलोमीटरचा हेलपाटा वाचला

करळ उड्डाण पुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन रविवारी जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. एक मार्गिका खुली झाल्यामुळे उरणकरांचा तीन किलोमीटरचा हेलपाटा कमी होणार असून, सततच्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

उरण-पनवेल मार्गावर करळ येथे रेल्वे फाटक होते. मार्गावरील सगळी वाहतूक या फाटकातूनच होत असे. मात्र 1992 मध्ये एका डंपरने रेल्वेला धडक दिल्यानंतर हे फाटक रेल्वेने कायमस्वरुपी बंद केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक करळ उड्डाण पुलावरून सुमारे 3 किलोमीटर वळसा घालून करावी लागत असे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्चदेखील वाढला होता. तसेच पुलावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचा खोळंबा होत होता. त्यामुळे हे फाटक सुरू करावे यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पाटील यांनी याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

मात्र हे फाटक सुरू झाले नाही. जेएनपीटीने 17 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्ता रूंदीकरणाचे भूमिपूजन करून त्यावर उपाय म्हणून करळ फाटा येथे सुमारे 350 कोटी खर्च करून फुलपाखराच्या आकाराचे इंटरचेंज (अदलाबदल) पूल उभारण्याचे काम हाती घेतले. मागील 3 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. मात्र उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी या पुलाची उरण-पनवेल मार्गाला जोडणारी एक मार्गिका लवकर पूर्ण करून ती वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

First Published on: January 29, 2020 1:20 AM
Exit mobile version