एकीकडे दंगल तर दुसरीकडे दरोडा, कोल्हापुरातील घटनेने सराफा व्यायसायिकांमध्ये घबराट

एकीकडे दंगल तर दुसरीकडे दरोडा, कोल्हापुरातील घटनेने सराफा व्यायसायिकांमध्ये घबराट

भर दिवसा घडलेल्या फिल्मी स्टाईल दरोड्याने कोल्हापुरात खळबळ

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून दंगलसदृश परिस्थितीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले आहे. बुधवारी कोल्हापूर शहरात झालेल्या राड्यानंतर 30 तासांपेक्षा अधिक काळासाठी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पण हे सगळंकाही घडत असतानाच कोल्हापुरात घडलेल्या आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील बालिंगा गावात एका सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल टाकलेल्या या दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा – शरद पवार धमकी प्रकरणावरून छगन भुजबळ राज्य सरकारवर संतापले, म्हणाले…

गुरुवारी (ता. 08 जून) भर दुपारी बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला. या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. . दुकानाचे मालक रमेश शंकरजी माळी (वय 40) आणि त्यांचे मेव्हुणे जितू मोड्याजी माळी (वय 30, दोघे रा. बालिंगा) अशी जखमींची नावे आहेत. यातील दुकानाचे मालक रमेश माळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे, तर दरोडेखोरांनी यावेळी हवेत गोळीबार करत घटना स्थळावरून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश माळी यांचे बालिंगा मेन रोडवरील मुख्य बसस्टॉपजवळ कात्यायनी नामक ज्वेलर्सचे दुकान आहे. रमेश यांना चार भाऊ असून, सर्वजण याच व्यवसायात आहेत. काल दुपारी रमेश यांच्यासह त्यांचा मुलगा मुलगा पीयूष (वय वर्षे 13) आणि त्यांचे मेहुणे जितू माळी हे दुकानात बसले होते. त्याचवेळी 1.45 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींवरून चौघे जण कोल्हापूरच्या दिशेने दुकानासमोर आले. यांतील दोघे जण मागे थांबले होते तर दोण दरोडेखोर हे दुकानात घुसले.

यानंतर त्यांनी जितू आणि रमेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवत सारा माल द्या, असे धमकावले. दरोडेखोरांपैकी एकाने काउंटरवरच्या काचांवर गोळ्या झाडल्या व दागिन्याचे बॉक्स उचलण्यास सुरुवात केली. यावेळी जितू दुकानातील बेसबॉल स्टिक घेऊन दरोडेखोरांच्या अंगावर धावून गेले. पण दरोडेखोरांनी त्यांच्या पायावर गोळ्या झाडत त्यांना जखमी केले. तर जितू यांच्या हातातील बेसबॉल स्टिक घेऊन त्यांनी रमेश यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे रमेश हे देखील त्यावेळी खाली पडले.

सदर घटना घडत असताना दुकानाच्या बाहेरच्या लोकांची गर्दी जमली होती. पण वाढती गर्दी पाहता या दरोडेखोरांनी हाती लागलेले सामान घेऊन दुकानाच्या बाहेर येऊन जमलेल्या गर्दीच्या दिशेने हवेत गोळीबार केला. त्यानंतर हे दरोडेखोर दुचाकीवरून पळून जात असतानाच दुकानाचे मालक रमेश हे जखमी अवस्थेत बाहेर आले. पण दरोडेखोरांनी पुन्हा एकदा त्यांच्या दिशेने बंदुक रोखले.

यावेळी घाबरलेले रमेश पुन्हा दुकानात गेले व त्यांनी काचेचा दरवाजा बंद केला. पण दरोडेखोरांनी पुन्हा काचेवर गोळीबार केल्याने दरवाज्याची अखंड काच त्यांच्या डोक्यात पडली. ज्यानंतर ते जागीच बेशुद्ध झाले. त्यानंतर दरोडोखोर दुचाकीवरून कळे गावाच्या दिशेने गेले. यावेळी त्यांच्यावर ग्रामस्थांकडून दगडफेक देखील करण्यात आली. मात्र दरोडेखोरांनी ग्रामस्थांच्या दिशेने दुचाकीवरून गोळीबार केला. हा फिल्मी स्टाईल प्रकार घडत असताना रस्त्यावरून वाहतूक सुरु होती, मात्र दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने वाहतूक थांबली. ज्याचा फायदा घेत दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, या घटनेमध्ये रमेश माळी यांचा मुलगा पीयूष याने प्रसंगावधान दाखवत शिताफीने दुकानातील स्ट्रॉंगरूमध्ये स्वतःला बंद करून घेतले. ज्यामुळे दुकानातील चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित राहिली. पण दरोडेखोरांनी दुकानातील तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख असा सुमारे एक कोटी 82 लाखांचा मुद्देमाल लुटल्याचे सांगण्यात आले आहे.

या दरोडेखोरांनी दुकान लुटण्यासाठी स्वयंचलित पिस्तुल आणले होते. त्यांनी दुकानाच्या आत आणि बाहेर असे मिळून 15 राउंड फायर केले. सदर घटना घडताच पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, निरीक्षक अरविंद काळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केला असून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: June 9, 2023 1:15 PM
Exit mobile version