नाशिकनंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

नाशिकनंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

नाशिकनंतर पुण्यातील तीन बड्या बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली. तब्बल ४० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते. या कारवाईत काही कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील आयटीने सिंध सोसायटी आणि शहरातील पिंपरी चिंचवड परिसरात तसेच पुणे शहरातील इतर भागात छापे टाकल्याची माहिती आहे. या संदर्भात मात्र आयकर विभागाकडून याबाबत दुजोरा देण्यात आला नाही. आयकर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार आणि कर चुकवेगिरीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांची अनेक कागदपत्रे आणि फाइल्सची तपासणी सुरू आहे.

मागील अनेक महिन्यांत महाराष्ट्रासह देशभरात आयकर विभागाच्या मार्फत विविध ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. २० एप्रिल रोजी नाशिक शहरात एकाच वेळी २० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती. अचानकपणे हे छापे पडले होते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते.


हेही वाचा : तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद


 

First Published on: May 4, 2023 3:48 PM
Exit mobile version