फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टच्या महसुलात वाढ, २२ हजार प्रवाशांकडून लाखोंचा दंड वसूल

फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टच्या महसुलात वाढ, २२ हजार प्रवाशांकडून लाखोंचा दंड वसूल

मुंबई – बेस्ट उपक्रम (BEST Bus) अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. त्यातच बेस्टच्या परिवहन विभागाच्या बसने गेल्या ७ महिन्यात विना तिकीट म्हणजे फुकटात प्रवास करणाऱ्या २२ हजार प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून १४ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे एकप्रकारे बेस्टच्या उत्पन्नात भर पडली आहे. (Increase in revenue of BEST bus due to free passengers, collected fine of lakhs from 22 thousand passengers)

मुंबईकरांना स्वस्त, मस्त आणि डिजिटल सुविधांसह अखंडित प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रम घडवत आहे. बेस्टचा परिवहन विभाग अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात होता. आता वीज विभागही तोट्यात आला आहे. त्यातच बेस्टकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी चुकती करण्यासाठी पैशांची चणचण आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेकडून बेस्टला कर्मचाऱ्यांची थकीत देणी चुकती करण्यासाठी ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यापूर्वीही पालिकेनेच बेस्टला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत वेळोवेळी दिली आहे.

हेही वाचा – विनातिकिट प्रवास करताय? फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने वसूल केले १६३ कोटींचा दंड

तर दुसरीकडे बेस्टच्या बसगाड्यांमधून तिकीट न काढता फुकटात काही प्रवासी प्रवास करीत आहेत. ही गंभीर बाब बेस्टच्या निदर्शनास आल्याने बेस्टच्या पथकाने जानेवारी ते जुलै २०२१ या ७ महिन्यात २२ हजार १०० फुकट्या प्रवाशांना (यामध्ये प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त अंतर प्रवास करणाऱ्यांचा समावेश आहे.) ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख ५८ हजार ३२६ रुपये दंड वसूल केला.

फुकट्या प्रवाशांवर करण्यात आलेली कारवाई

जानेवारी महिन्यांत ३,६७३ फुकट्या प्रवाशांकडून २,३४,१६८ रुपये दंड वसुली, फेब्रुवारीत ३,१०४ फुकट्या प्रवाशांकडून १,९७,४०७ रुपये, मार्चमध्ये ३,५३९ फुकट्या प्रवाशांकडून २,२३,२६७ रुपये, एप्रिलमध्ये ३,१२१ प्रवाशांकडून १,९८,५२८ रुपये, मे महिन्यात ३,१७२ फुकट्या प्रवाशांकडून २,००,८९३ रुपये, जूनमध्ये ३,२९८ फुकट्या प्रवाशांकडून २,०५,३४८ रुपये आणि जुलैमध्ये ३,१९३ फुकट्या प्रवाशांकडून १,९८,७१५ रुपये याप्रमाणे एकूण २२ हजार १०० फुकट्या प्रवाशांकडून १४,५८,३२६ रुपये एवढी रक्कम दंड वसुलीपोटी जमा करण्यात आली आहे.

First Published on: October 6, 2022 7:23 PM
Exit mobile version