बीपीच्या रूग्णांकरीता मुंबई मनपा सरसावली, मॉल आणि रेल्वे स्थानकात बीपी तपासणी मोहीम

बीपीच्या रूग्णांकरीता मुंबई मनपा सरसावली, मॉल आणि रेल्वे स्थानकात बीपी तपासणी मोहीम

मुंबईकरांमध्ये रक्तदाबाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबई महापालिकेने त्यांच्याकरीता खास एक सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय. याच दृष्टीने मुंबई महापालिका पुढे सरसावली असून मॉल आणि रेल्वे स्थानकात बीपी तपासणी मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.

मुंबईत हायपर टेन्शनच्या रुग्णांमध्ये ‘बीपी’ ची समस्या अधिक असते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने या ‘बीपी’ला कंट्रोल करण्यासाठी पालिका रुग्णालये, दवाखाने त्याचप्रमाणे महत्वाचे मॉल व रेल्वे स्थानके आदी ठिकाणीही लवकरच ‘बीपी’ तपासणी मोहीम राबविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे मुंबईकरांना विशेषतः ‘बीपी’ ची समस्या असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली आहे. बहुसंख्य लोकांना आपल्याला ‘बीपी’ चा त्रास असल्याची माहितीच नसते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा ‘बीपी’ वाढला किंवा कमी झाला तरी संबंधित रुग्णाला व परिणामी घाबरलेल्या त्याच्या नातेवाईकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे ‘बीपी’ नियंत्रणात असणे खूप गरजेचे असते. अन्यथा त्याचा परिणाम मोठया आजारांवरही होऊन प्रसंगी हायपर टेन्शनमुळे हार्टटॅक येऊन रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालिका आता रुग्णालयात ‘बीपी’ ची तपासणी कटाक्षाने करण्यात येणार आहे. तसेच, महत्वाचे मॉल व रेल्वे स्थानके आदी ठिकाणीही लवकरच ‘बीपी’ तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

आरोग्य स्वयंसेविकांचे मानधन दुप्पट

मुंबई महापालिकेच्या आरोग्यदायक मोहिमा भर पावसातही यशस्वीपणे राबविणाऱ्या व झोपडपट्टीत घरोघरी जाऊन आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या ‘आशा’ वर्कर्स, आरोग्य सेविकांना प्रतिदिन मिळणारे १०० ते १५० रुपये मानधन आता दुप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर आरोग्य सेविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालिकेची ‘हायपर टेन्शन मोहीम’ राबविण्यासाठी याच आशा वर्करचा मोठा हातभार लागणार आहे. त्यासाठी त्यांना अधिकचे मानधनही देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.

मुंबईकरांनो कमी करा ‘मिठ’ तर तब्येत राहील ‘नीट’

मुंबईकरांनी दररोजच्या आहारात ५ ग्रॅम मीठ खाणे अपेक्षित असताना ते चक्क ९ ग्रॅमपेक्षाही जास्त मीठ खात असल्याचे एका आरोग्य सर्वेक्षणात आढळून आले आहे. मिठ जास्त खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बीपी वाढण्यास मदत होते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.


हेही वाचा : जिल्हा दूध संघाच्या कथित गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती, शिंदे-फडणवीस सरकारचा खडसेंना धक्का


 

First Published on: July 28, 2022 10:05 PM
Exit mobile version