भारत पुन्हा धवल क्रांतीच्या दिशेने; दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर

भारत पुन्हा धवल क्रांतीच्या दिशेने; दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली: भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसमधील (एफएओएसटीएटी) उत्पादनविषयक माहितीनुसार 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्क्यांचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2014-15 ते 2021-22 अशा मागील 8 वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन 22 कोटी टनांपर्यंत वाढले आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना दुग्ध उत्पादनातील भारताचे यश अधोरेखित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध उत्पादन क्षेत्राचे नेतृत्व खर्‍या अर्थाने महिलाच करतात. कारण दुग्ध उत्पादनात महिलांचे 70 टक्के योगदान आहे. सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय साकारणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे असे म्हणता येईल. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगाचे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

दूध उत्पादनात राज्यांची क्रमवारी
देशात राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही सर्वाधिक दूध उत्पादन करणारी राज्ये आहेत. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दूध उत्पादनात उत्तर प्रदेश प्रथम, तर राजस्थान दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे.


हेही वाचाः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेंची ख्याती पोहोचली सातासमुद्रापार; न्यूयॉर्कमधील टाईम्स क्वेअरमध्ये लागले बॅनर

First Published on: February 8, 2023 11:47 PM
Exit mobile version