दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत, नाना पटोलेंचे सूचक विधान

दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत, नाना पटोलेंचे सूचक विधान

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवेंची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महाविकास आघाडीत मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विश्वासात न घेताल ही नियुक्ती केल्याची खदखद काँग्रेस नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत बोलताना दोस्तीमध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत, असे सूचक विधान केले आहे.

16 ऑगस्टला महाविकास आघाडीची समन्वय बैठक –

महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी मी स्वत: आणि बाळासाहेब थोरात पदयात्रेत व्यग्र आहे. त्यामुळे काल (बुधवार)च्या बैठकीला अशोक चव्हान उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी पुढची बैठक 16 ऑगस्टला होणे अपेक्षित आहे, असे सांगीतले.

महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली –

दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत. आपल्याच मताने सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत. महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी तसा निर्णय घेतला होता, असे नाना पटोले म्हणाले.

आमच्या मित्रांनी प्रामाणिक रहावे – 

पुढे त्यांनी माझे ज्यावेळी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरले होते तेव्हा मी सगळ्यांना सांगायला गेलो होतो. त्यांना फॉरमॅलिटी देखील पाळायची नसेल तर ठीक आहे कुणावरही जबरदस्त नाही. काँग्रेस हा जनतेतील पक्ष आहे आणि निश्चितपणे जनता काँग्रेससोबत आहे. आमच्या मित्रांनी प्रमाणिकपणे रहावे आणि विचारविनिमय करावा हीच विनंती आहे.

विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावे –

खालच्या सभागृहात अजित पवार आहेत आणि वरच्या सभागृहात नीलम गोऱ्हे आहेत. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे अशी आमची इच्छा होती. आमच्या जागा कमी असल्याचा विषयच नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. नाहीतर त्यांचेही दहाच असते असे नाना पटोले म्हणाले.

First Published on: August 12, 2022 3:48 PM
Exit mobile version