इंद्रायणीचा हंगाम सुरू; सुवासिक, चविष्ट तांदळाला खवय्यांची पसंती

इंद्रायणीचा हंगाम सुरू; सुवासिक, चविष्ट तांदळाला खवय्यांची पसंती

पुणे – आंबेमोहराचा सुवास, चवीला गोड, खाण्यास मऊ , पण थोडा चिकट असलेल्या इंद्रायणी तांदळाचा हंगाम आता सुरू झाला आहे. परतीच्या पावसातही इंद्रायणीच्या पिकांना धक्का न लागल्याने यंदा पीक समाधानकारक होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. तसंच, यंदा इंद्रायणीचे भावही जैसे थे राहणार आहेत.

पुण्यातील मावळ तालुक्यात गेल्या २० ते २५ वर्षांपासून इंद्रायणीची लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागातील तुंग, शिळीम, मोरवी, येळसे, कोथुर्णी, वारू, लोहगड, घालेवाडी, इंदोरी गावांत पारंपरिक पद्धतीने इंद्रायणीची शेती केली जाते. मावळ तालुक्यात जवळपास ९०० ते ९५० हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणीचं पीक घेतलं जातं. एका एकरमागे इंद्रायणीचे ४० पोती उत्पादन होते. एका पोत्यात ७० किलो तांदूळ असतो. या अंदाजाने एका एकरमागे २८० किलो इंद्रायणीचं उत्पादन घेतलं जातं.

हेही वाचा – साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर मोदी सरकार बंदी आणण्याची शक्यता, जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ

जुलैच्या पहिल्या आठवड्यात इंद्रायणीच्या लागवडीला सुरुवात होते. यासाठी चांगल्या प्रतीची बियाणं आणि खतांचा वापर केला जातो. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात इंद्रायणीच्या कापणीला सुरुवात होते. आता आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही पद्धतीने कापणी केली जाते. कापणी आणि झोडणी झाल्यानंतर व्यापारी भाताची खरेदी करतात.

पुण्यासह मुंबई, ठाणे, डोंबिवलीत इंद्रायणी भात चवीने खालला जातो. या भाताला शहरी भागात प्रचंड मागणी आहे. मऊ, सुवासिक आणि चविष्ट असल्याने एकदा हा भात खालल्यानंतर चव जीभेवर रेंगाळत राहते. परंतु, गेल्या काही वर्षांत इंद्रायणी तांदळाचीही भेसळ बाजारात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरी भागातील ग्राहक थेट शेतकऱ्यांकडूनच तांदूळ खरेदी करतात. सध्या या तांदळाचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा – तांदूळ नाही तर बटाट्या पासून बनवा झटपट ईडली

इंद्रायणीला सुगंध कसा?

इंद्रायणीला टूएपी या घटकामुळे सुगंध प्राप्त होतो. पीकाला सुवास येण्याकरता हवामानही अनुकूल असावं लागतं. तांदळाचे पीक फुलोऱ्यात असताना आर्द्रता ६९ ते ७४ टक्के लागते. यामुळे तांदळाला सुवास प्राप्त होतो. म्हणजेच सुवासासठी जमिनीचे गुणधर्मही कारणीभूत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मावळसहीत इतर भागातही इंद्रायणीची लागवड केली जातेय. त्यामुळे या तांदळाला सुवास येण्याकरता रायानिक पूड वापरली जाते. या सुगंधी द्रव्यांना अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. रासायनिक पूड वापरलेला तांदूळ धुतला की त्याचा सुगंध निघून जातो. त्यामुळे अशा बनावट तांदळापासून सावध राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – हातसडीचा तांदूळ ठरतोय आरोग्यासाठी हितकारक ; मधुमेहींसाठीही उपयुक्त

First Published on: November 14, 2022 12:05 PM
Exit mobile version