Inside Story! श्रद्धाला आधीच होता तिच्या हत्येचा संशय; मित्राला सांगितलं असं काही…

Inside Story! श्रद्धाला आधीच होता तिच्या हत्येचा संशय; मित्राला सांगितलं असं काही…

दिल्लीसह महाराष्ट्राला हादरवणारी भयंकर घटना सोमवारी उघडकीस आलीय. महाराष्ट्रातील श्रद्धा वायकर हिची हत्या करून तिचे 35 तुकडे करण्यात आलेत. त्यामुळेच याची सगळीकडेच चर्चा आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वायकर आणि बॉयफ्रेंड आफताब यांची एका डेटिंग अॅपवरून मैत्री झाली. दोघेही 2018 पासून एकत्र होते आणि एकमेकांसोबत खूप आनंदी असायचे. कालांतराने त्यांच्या नातेसंबंधात कटुता आली. रोजच्या मारामारी आणि भांडणांना कंटाळून श्रद्धाने हे नाते संपवायचे ठरवले. एका रात्री तर तिने मैत्रिणीला सांगितले होते की, आज जर ती घरातून बाहेर पडली नसती तर आफताबने तिची हत्या केली असती.

श्रद्धाच्या एका जुन्या मित्राने एएनआय या वृत्तसंस्थेला महत्त्वाची माहिती दिली. सोमवारी श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने सांगितले की, जेव्हा अचानक तिच्या हत्येची बातमी मोबाईलवर पाहिली तेव्हा मी हादरलो. माझा विश्वास बसत नाही की, माझ्या मैत्रिणीची हत्या झाली. तिने आम्हाला 2019 मध्ये सांगितले की, ती 2018 पासून आफताबसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण नंतर श्रद्धाने सांगायला सुरुवात केली की, आफताब तिला अनेकदा मारहाण करतो. तिला त्याला सोडून जायचे होते, पण त्याने बळजबरीने तिला ठेवले आहे.

दिल्लीला गेल्यानंतर मित्रांशी संपर्क तुटला
रजतने सांगितले की, श्रद्धाला त्या नात्यातून बाहेर पडणे खूप कठीण झाले होते. तिचे जीवन नरकासारखे झाले होते. दिल्लीला राहण्याचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतला होता. यंदा ८ मे रोजी दोघेही दिल्लीत आले होते. श्रद्धा दिल्लीत आल्यानंतर तिचा जवळजवळ संपर्क तुटला होता.

श्रद्धाला पोलिसांत तक्रार करायची नव्हती
पालघरमधील श्रद्धाचा आणखी एक मित्र लक्ष्मण नादिरने सांगितले की, श्रद्धा आणि आफताबमध्ये खूप भांडण व्हायचे. नातेसंबंधांच्या वाईट स्थितीबद्दल श्रद्धाने अनेकदा सांगितले होते. लक्ष्मण म्हणाला की, आम्ही एकदा तिच्यासाठी पोलिसांकडे जाण्यास तयार होतो, पण तिचा त्याला विरोध होतो. तिच्या भावनांचा आदर करून आम्ही पोलिसांना काहीही सांगितले नाही.

मित्राला सांगितले होते की, आफताब आज रात्री मला मारेल
लक्ष्मण म्हणाला की, एके दिवशी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके वाढले की, श्रद्धाने मला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला आणि त्या रात्री मला कुठेतरी घेऊन चल, असं तिने सांगितले. त्या रात्री ती आफताबसोबत राहिली तर तो तिला मारून टाकेल, असेही श्रद्धाने सांगितले. श्रद्धाला तिच्या हत्येचा संशय फार पूर्वीपासून होता. श्रद्धाच्या सांगण्यावरून तिच्या मैत्रिणींनी तिला त्या एका रात्री घराबाहेर काढले होते. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, असंही श्रद्धाच्या मैत्रिणींनी आफताबला ठणकावलं होतं.

ऑगस्टनंतर श्रद्धासोबतचा संपर्क तुटला
लक्ष्मणने सांगितले की, मृत्यूच्या दोन महिने आधी श्रद्धाने माझ्याशी संपर्क साधला होता. ऑगस्टपासून तिने माझ्या कोणत्याही मेसेजला उत्तर दिलेले नाही. तिचा फोनही बंद होता. तेव्हापासून माझी चिंता वाढली. तेव्हा पोलिसांची मदत घ्यावी, असे वाटले. मी शेवटी तिच्या भावाला सांगितले की, श्रद्धाचे काही अपडेट नाही. त्यामुळे नंतर आम्ही पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले.

दिल्ली पोलिसांकडे आफताबकडून सर्व गुपिते उघड
यानंतर श्रद्धाच्या कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. सोमवारी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबला अटक करून संपूर्ण हत्येचे रहस्य उलघडले. आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत होती. त्या कारणास्तव आफताबने 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला, त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.


हेही वाचाः माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही, विधानसभेच्या अध्यक्षांचा खुलासा

First Published on: November 15, 2022 11:24 AM
Exit mobile version